करंजफेण : कोतोली गावचे सरपंच हे मनमानी कारभार करीत असल्याबद्दल पन्हाळा गटविकास अधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या असून, एकूण अकरा मुद्यावर सरपंच दोषी असून, बदनामी वाचविण्यासाठी बिनबुडाचे आमच्यावर आरोप करीत असल्याचे मत जि.प.सदस्य शंकर पाटील व उपसरपंच राजेंद्र लव्हटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरपंचांनी उपोषण करून ध्वजारोहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार हा चुकीचा असून आपल्यावरील आरोप पत्रातील कागदपत्रे खोटी आहेत असे म्हणणे म्हणजे गावकऱ्यांची दिशाभूल असून, कागदपत्रे खोटी आहेत, तर मग त्यांनी आपल्या बचावासाठी खरी कागदपत्रे सादर का केली नाहीत. जर कागदपत्रे खोटी असती तर तीन प्रशासकीय स्तरावर चौकशीत सरपंच दोषी सिद्ध झाले नसते असे उपसरपंच राजेंद्र लव्हटे यांनी सांगितले. आपल्यावरील आरोप लपविण्यासाठी उपोषणाचा पवित्रा घेऊन आपली जबाबदारी विरोधकांवर झटकून कोतोली गावातील नागरिकांनी दिलेल्या लोकमताचा विश्वासघात करीत ग्रामस्थांची व प्रशासनाची पद्धतशीर दिशाभूल करीत आहेत. गावची ७० लाखांची कामे रखडली आहेत, असे सरपंच म्हणत असतील तर प्रत्यक्षात मंजूर रक्कम किती आहे याचीच माहिती सरपंचांना नाही. कामे अडविली म्हणणे हा निव्वळ पोरकटपणा आहे. मंजूर कामापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे खाजगी जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे थांबली आहेत. गावच्या विकासाला खीळ बसण्यास पूर्णत: सरपंच जबाबदार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय पाटील, महादेव पोवार, प्रशांत पाटील, महादेव पाटील उपस्थित होते.
आरोप लपविण्यासाठी कोतोली सरपंचांचा अटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:22 AM