मागील आठवड्यात पहिल्यांदाच पडलेल्या पावसाने झांबरे प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे ताम्रपर्णी नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे व कचरा वाहत येऊन कोवाड बंधाऱ्यामध्ये येऊन अडकली होती. त्यामुळे चार दिवस बंधाऱ्यावरून पाणी पडत होते. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारीच तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोवाड बंधाऱ्यात अडकलेली झाडे-झुडपे जेसीबीद्वारे काढण्यात आली.
वरिष्ठ लिपिक सुहास रेडेकर तसेच कालवा निरीक्षक वसंत भोगण व सचिन गावडे आदींनी याकामी परिश्रम घेतले. कोवाड बंधाऱ्याच्या खाली असलेल्या दुंडगे आणि कामेवाडी बंधाऱ्यात अडकलेली लाकडे व कचरा दोनच दिवसांत काढून टाकणार असल्याची माहिती तुषार पवार यांनी दिली. पाटबंधारे विभागाच्या कार्यतत्परतेबद्दल नदीकाठच्या गावांतून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो ओळी : ताम्रपर्णी (ता. चंदगड) येथील नदीवरील कोवाड बंधाऱ्यात अडकलेली झाडे व कचरा जेसीबीद्वारे काढल्यानंतर मोकळा झालेला कोवाड बंधारा.
क्रमांक : २८०६२०२१-गड-०२