कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढत असलेली रुग्ण संख्या, स्थीर असलेली मृत्यूसंख्या, कोरोनाला हद्दपार करण्यात येत असलेले अपयश लक्षात घेत यापूर्वी लागू करण्यात आलेले स्तर -४ चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. म्हणजेच यापूर्वी जिल्ह्यासाठी जे निर्बंध होते तेच कायम आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यातील निर्बंध पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील, असे प्रशासनाच्यावतीने रविवारी स्पष्ट करण्यात आले .
कोविड -१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असताना यापूर्वी जाहीर केलेल्या निर्बंधासोबतच खालील काही विशेष उपाययोजनेबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी जाहीर केले.
कोविड -१९ च्या नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल असे कार्यक्रम, उपक्रम, परिषदा, मेळावे घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नियमांचे पालन होते का नाही याची पाहणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात यावीत. त्यांच्यामार्फत विशेषत: लग्नसमारंभ, रेस्टॉरंट, मॉल या ठिकाणी तपासणी करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा आरटीपीसीआर टेस्ट व त्यामध्ये आलेली पॉझिटिव्ह पेशंटच्या संख्येनुसार ठरविण्यात येतो. निर्बंधाचा स्तर कमी करत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्ह्यातील मागील दोन आठवड्याची कोविड संसर्गित रुग्णांच्या संख्येचा कल विचारात घेऊन निर्णय घेणार आहे.
- प्रशासनाच्या आदेशातील सूचना-
- लसीकरणाबाबत सार्वजनिक जनजागृती करावी
- लसीकरणास पात्र लोकसंख्येच्या ७० टक्केपर्यंत लसीकरण पूर्ण करावे.
- कामाच्या ठिकाणी उपस्थित कामगारांचे लसीकरण करावे.
- कोविड संसर्ग रोखणेसाठी चाचणी, शोध, उपचार या पद्धतीचा प्रभावी वापर करावा.
- सुरक्षित कामाच्या जागा निश्चित करून आस्थापनांनी योग्य वायूविजन योजना करावी.
- मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या करण्यात याव्यात.
- आरोग्य विभागास अभिप्रेत असलेली आरटीपीसीआर चाचण्यांची टक्केवारी वाढवावी.
अत्यावश्यक सेवेतीलच दुकाने सुरू राहणार-
निर्बंध कायम ठेवण्याचे आदेश रविवारी दिल्यामुळे अत्यावश्यक सेवेतीलच दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. अन्य सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, बार परमिटरूम आदी व्यवसाय बंद राहतील, पार्सल सेवा मात्र सुरू राहणार आहे. शनिवार, रविवारचा विकेंड लॉकडाऊन कायम राहणार आहे.