कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारपासून कोविड वॉररूम सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्यावतीने शहरातील नागरिकांना खासगी व सरकारी रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती चोवीस तास देण्याकरिता ही वॉररूम उपयोगी ठरणार आहे.
कोल्हापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपचाराकरीता रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. रात्री-अपरात्री रुग्णाला कोणत्या रुग्णालयात घेऊन गेलो की लगेच उपचार मिळतील याची माहिती या वॉररूममधून दिली जाणार आहे. खासगी व सरकारी रुग्णालयांतील उपलब्ध बेडची माहिती चोवीस तास मिळेल.
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. या वॉररूममध्ये चोवीस तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वॉररूममध्ये शहरातील कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहे याची अचूक माहिती मिळणार आहे. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उप-आयुक्त निखिल मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- वॉररूमचा क्रमांक -
टोल फ्री क्रमांक - ०२३१- २५४५४७३ व ०२३१ -२५४२६०१ नंबरवर संपर्क केल्यास कोविड-१९ उपचारासाठी बेडची माहिती मिळणार आहे.