लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असले तरी दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा कोविड भत्ता १ सप्टेंबर २०२१पासून बंद केला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आता याविरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यांच्या योगदानाची दखल घेत सुरूवातीला १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार त्यांना कोविड प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या लाटेचा विचार करून १ मार्च २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ या काळातही असा प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला. परंतु, १ सप्टेंबरपासून कोणत्याही कंत्राटी अधिकारी, कर्मचारी आणि आशांना कोविड प्रोत्साहन भत्ता देय राहणार नाही, असे स्पष्ट पत्र प्रत्येक जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले आहे. दि. ३१ ऑगस्टपर्यंतचाच भत्ता अदा करावा. त्यानंतरचा भत्ता अदा करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोट
गेली दोन वर्षे कोरोना काळामध्ये याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोठे काम केले आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. मात्र, आता लाट कमी आल्यानंतर त्यांचा भत्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी सगळीकडील कोरोना संपला, अशी परिस्थिती नाही. तालुका पातळीवरचे अधिकारी अजूनही आशा आणि अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाविषयक कामे सांगत आहेत. जर भत्ता मिळणार नसेल तर कोरोनाविषयक कामे कोणीही कर्मचारी करणार नाहीत.
- सुमन पुजारी
आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना, कोल्हापूर