जयसिंगपूर : गतवर्षी कोरोना महामारीच्या काळात जयसिंगपूर नगर परिषद, सर्व नगरसेवक व नगरसेविका, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, स्वामी समर्थ केंद्र, दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट, आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांच्यासह तरुण मंडळे, सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सिद्धिविनायक मंदिर परिसरात सुरू केलेले कोविड केअर सेंटर शासनाच्या ताब्यात दिले होते. हे सेंटर आज शनिवारपासून पुन्हा सुरू करून शासनाकडे सुपुर्द करणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी दिली.
कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली वाढ याची दखल घेत हे कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यामध्ये १०० ऑक्सिजन बेड, २५ एनआयव्ही बेड तसेच २५ कॉन्सन्ट्रेटर बेडसह प्रशिक्षित स्टाफ व कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने उपचाराच्या सर्व सुविधा विनामूल्य सेंटरमधून रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष यड्रावकर यांनी दिली. यावेळी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.