शिरोळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोविड सेंटर आदर्शवत आहे. या सेंटरमध्ये अनेकविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, मोफत उपचार केले जाणार आहेत. तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट आल्यास हे सेंटर आधारवड ठरणार आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्टच्या ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लहान मुलांचे कोविड सेंटरचे उद्घाटन मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते झाले. डॉ. अतुल पाटील यांच्या सहकार्यातून या सेंटरमध्ये दहा ऑक्सिजन, पंधरा विना ऑक्सिजन असे २५ बेडचे सेंटर उभारण्यात आले आहे. लहान मुलांसाठी जेवण, मनोरंजनासाठी खेळणी, कार्टून स्क्रीन आणि नियमित व्यायाम, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जि. प. सदस्य डॉ. अशोकराव माने, डॉ.अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, गटविकास अधिकारी शंकर कवितके, नगरसेवक शरद मोरे, योगेश पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत डी. आर. पाटील तर मोहन माने यांनी आभार मानले.
फोटो - ०७०६२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ येथे लहान मुलांचे कोविड सेंटरचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. यावेळी डॉ. अशोकराव माने, अमरसिंह पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.