कोल्हापूर : बिनखांबी गणेश मंदिराजवळील 'ब्राह्मण सभा करवीर' या संस्थेच्या मंगलधाम या इमारतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सहकार्याने गरजूंसाठी सवलतीच्या दरामध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करीत आहोत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मराठे आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी सोमवारी दिली.
शहरातील कोविड संक्रमणाच्या वाढत्या प्रभावामुळे कोविडच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामध्ये अनेक रुग्णांना लक्षणे नसतात किंवा सौम्य लक्षणे असतात; परंतु त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना गृह किंवा संस्थात्मक अलगीकरणामध्ये राहण्यास सांगितले जाते. शहरातील प्रामुख्याने जुन्या पेठांमध्ये घरे छोटी व कुटुंबे मोठी असल्यामुळे गृहअलगीकरण साध्य होत नसते. तसेच मोठ्या दवाखान्यांमधून दाखल होऊन उपचार घेणे काही रुग्णांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. अशा रुग्णांसाठी अतिशय सवलतीच्या दरामध्ये हे केंद्र सुरू करण्यात येत आहे.
या केंद्रामध्ये केवळ लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाच दाखल करून घेतले जाईल. दाखल केलेल्या कालावधीमध्ये त्यांची दैनंदिन वैद्यकीय तपासणी, न्याहारी व भोजन, औषधोपचार, समुपदेशन अशा सर्व प्रकारे काळजी घेतली जाईल, असे अध्यक्ष मराठे यांनी सांगितले.
गरजू रुग्णांनी या केंद्राचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी केले आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष कोडोलीकर, ज्येष्ठ संचालक डॉ. दीपक आंबर्डेकर, ॲड. विवेक शुक्ल, डॉ. उदय कुलकर्णी, पंडित धर्माधिकारी, राम टोपकर, अशोक कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.