कोल्हापूर : बागल चौक कब्रस्थानची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले नाही तर कोविडमुळे मयत झालेल्या एकाही व्यक्तीचे दफन येथे करू दिले जाणार नाही, असा इशारा मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर व प्रशासक कादर मलबारी यांनी दिला आहे. यासंदर्भातील एक निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.
गतवर्षी कोल्हापुरात कोविडमुळे मयत मुस्लीम व्यक्तींचा बागल चौक कब्रस्थान येथे दफन केले जात होते. तत्कालीन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, माजी महापौर निलोफर आजरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या विनंतीनुसार दफनविधी करता जागा उपलब्ध करून दिली. परंतु त्यावेळी कबरस्तानच्या आरसीसी कमान गेटमधून जेसीबी जात नाही या कारणास्तव दफनभूमीची संरक्षक भिंत पाडण्यात आली होती. महापौर यांच्या बजेटमधून ३० लाख तर आयुक्त यांच्या बजेटमधून ४० लाख निधी देऊन संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन दिले गेले. त्यांच्या शब्दाखातर आम्ही ती जागा उपलब्ध करून दिली.
नाल्याच्या बाजूला भराव टाकून दफनविधी करण्याचे आश्वासन दिले. माती काही प्रमाणात टाकली; मात्र त्याचे सपाटीकरण केले नाही. काम रेंगाळले आहे. आयुक्त, जिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती देऊनसुद्धा कामाची सुरुवात झालेली नाही. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही आजरेकर व मलबारी यांनी केली आहे.