सरवडे : माजी आमदार के. पी. पाटील यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सोळांकूर (ता. राधानगरी) येथे घरी भेट घेतली. आता आपण लढतो, पुढच्या वेळेला तुम्हाला संधी देतो, असे ‘के. पी.’ यांनी सांगितले; पण गणेशोत्सव सुरू आहे, चार दिवसाने यावर बोलूया, असे ‘ए. वाय.’ यांनी सांगितले. विधानसभेच्या उमेदवारीवरून मेहुण्या-पाहुण्यांमधील संबंध ताणले आहेत. त्यांच्या भेटीने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.‘राधानगरी-भुदरगड’च्या उमेदवारीवरून ‘के. पी.- ए. वाय.’ यांच्यात गेली दोन-तीन वर्षे संघर्ष सुरू आहे. गेली २0-२५ वर्षे एकमेकांच्या आधाराने राजकारण करणाऱ्या या मेहुण्या-पाहुण्यांत ‘भोगावती’च्या निवडणुकीनंतर विघ्ने निर्माण झाली. अलीकडे तर उमेदवारीवरून दोघांत शाब्दिक चकमकही उडाली होती. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच असा दोघांनीही निर्धार केल्याने राष्टÑवादीसमोरच पेच निर्माण झाला आहे. राधानगरी-भुदरगडमधील मुंबईतील रहिवाशांच्या मेळाव्यात ए. वाय. पाटील हे आपणास मदत करतील, अशी अपेक्षा के. पी. पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर या दोघांतील चर्चेसाठी प्रयत्न सुरू झाले.मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता के. पी. पाटील यांच्यासह जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने व जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील हे ए. वाय. पाटील यांच्या घरी पोहोचले. गेल्या २0-२५ वर्षांत दोघांनी ताकदीने सत्तास्थाने उभी केली. आता भांडत बसलो, तर सगळे अस्थिर होईल, झाले गेले विसरून पुन्हा एकदिलाने काम करूया, असे के. पी. पाटील यांनी सांगितले. विधानसभेच्या उमेदवारीचा वाद आहे, तो आपण बसून सोडवूया, आता मी लढतो, पुढच्या वेळेला तुम्ही लढा, अशी आॅफर ‘के. पी.’ यांनी ‘ए. वाय.’ यांना दिली. पण सध्या गणेशोत्सव आहे, यावर चार दिवसांनी बोलूया, असे ‘ए. वाय.’ यांनी सांगितले. दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ नको, अशा शब्दांत भैया माने, युवराज पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला...तर एवढी दुखापत झाली नसती‘आजपर्यंत आपण ‘के. पीं.’चा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांच्यासाठी जिवाचे रान केले. यावेळेला लढतो म्हणालो म्हणजे चूक केली का? दोन वर्षांपूर्वीच त्यांनी बोलावून घेऊन समजावून सांगितले असते, तर त्याचवेळी विषय संपला असता. एवढी दुखापत झालीच नसती. अशी परिस्थिती का निर्माण झाली, हे मलाच कळत नसल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले. यावेळी ‘ए. वाय.’ यांचे बंधू आर. वाय. पाटील हेही उपस्थित होते.हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रयत्न‘के. पी.- ए. वाय.’ यांच्यामुळेच आपण जिल्ह्याचा नेता होऊ शकलो, असे जाहीरपणे आमदार हसन मुश्रीफ यांनी कबूल केले होते; त्यामुळे या दोघांतील वाद टोकाला गेला तर त्यातून राष्ट्रवादीचे नुकसान होईल. सध्या या पक्षाला राज्यभर गळती लागली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद मिटवून जिथे पक्षाची ताकद आहे, तिथे अंतर्गत वाद मिटवण्यासाठी मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्यानेच ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.
‘के.पी.’ मनधरणीसाठी ‘ए. वाय.’ यांच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:42 AM