कोल्हापूर : येथील क्रांतिसिह नाना पाटील नगर सिद्धार्थ गार्डन कॉलनीतील पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. उपनगरातील चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. करवीर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.उन्हाळी सुट्टीमुळे लोक बाहेरगावी गेले आहेत. बंद घरे हेरून चोरट्यांनी शहरासह उपनगरांत धुमाकूळ घातला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील नगरात शनिवारी रात्री चोरट्यांनी पाच घरांची कुलपे व कडी-कोयंडा तोडून चोरी केल्याचे उघडकीस आले.
या परिसरात राहणारे अनिल पांडुरंग पाटील (वय ३४, रा. आवळी बुद्रुक, ता. राधानगरी) हे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरातील काडाप्पाच्या कपाटाजवळ ठेवलेली एक लाख १० हजारांची रोकड, सोन्याचा नेकलेस, गंठण लंपास केले.
पाटील रविवारी सकाळी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी करवीर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांना माहिती दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिद्धार्थ गार्डन कॉलनीत इतर चार ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजते. मात्र, तक्रारदार पुढे आलेले नाहीत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.