जयसिंगपूर : गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीला काळेकुट्ट रसायनयुक्त पाणी आल्याने जलचर प्राणी मृत पावत आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडल्याने पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे जयसिंगपूरसह कृष्णा नदीकाठच्या गावांत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याचा हद्द असलेली व शिरोळ तालुक्याची जीवनदायी असणारी कृष्णा नदी गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहे. गेला पावसाळा कोरडा गेल्याने नदी पात्रात अल्पसा पाणीसाठा असून पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. सांगली जिल्ह्यातील दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सांगली विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक संघटनांनी अनेकवेळा आंदोलने करूनही त्याकडे गांभीर्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी न पाहिल्यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांना चालना मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी आल्यामुळे नदीतील पाणी हिरवट व काळसर झाले आहे. त्यामुळे पाण्याचा उग्र वास येत असून नदीतील जलचर प्राणी मृत होत आहेत. यामुळेही नदी प्रदूषणात भरच पडत आहे. काही ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरण केंद्र नसल्यामुळे नदीतून थेट पाणी नळास येत असल्याने हे पाणी धोकादायक बनले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असूनसाथीच्या आजारांचा फैलाव होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. चार दिवसांपूर्वी उदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील दोन्ही विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना नदी प्रदूषणाबाबत घेराव घालून जाब विचारला होता. प्रदूषण करणाऱ्या घटकावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
कृष्णा काठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: January 25, 2016 1:01 AM