सांगली : पावसाचा जोर कमी झाला असला तरी, कोयना धरणातून रविवारी १७ हजार ६९०, तर चांदोली धरणातून १८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा आणि वारणा नदीकाठी चिंतेचे वातावरण पसरले आहे. सांगली शहरातील जामवाडी परिसरात नाल्यावाटे नदीचे पाणी घुसल्याने तेथील २० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सोमवारी कृष्णेच्या पातळीत वेगाने वाढ होणार असल्याने येथील शंभरावर कुटुंबांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात रविवारी पावसाचा जोर कमी झाला. सांगली शहरातही सायंकाळी अर्धा तासच पावसाने हजेरी लावली. चांदोली धरण परिसरातही रविवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्याने अद्याप चांदोलीतून १८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणेकाठी पूरस्थिती कायम आहे. वारणेपाठोपाठ आता कृष्णा नदीही पात्राबाहेर पडली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ रविवारी सायंकाळी ६ वाजता नदीची पातळी ३४ फुटांवर गेली होती. त्यामुळे जामवाडी परिसरात अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. कोयना धरणातून रविवारी दुपारी २ वाजता १७ हजार ६९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. विसर्ग मोठा असल्याने सोमवारी कृष्णा नदीपात्रात वेगाने वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सांगली शहरासह कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सांगली शहरात दोनवेळा जामवाडी परिसरातील लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. कोयनेतील विसर्ग आणखी दोन दिवस चालू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली शहरातील नदीकाठच्या अनेक वस्त्या पाण्याखाली जाण्याची चिन्हे आहेत. येथील कुटुंबांच्या स्थलांतराची व्यवस्था महापाालिका प्रशासनाने केली आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाने सातत्याने नदीपातळी व विसर्गावर लक्ष केंद्रित केले आहे. (प्रतिनिधी) कृष्णा नदीची पातळी (फूट) बह १२.६ ताकारी ३६.१ भिलवडी ३७.६ आयर्विन ३४ अंकली ३९.९ म्हैसाळ बंधारा ४५ रविवारी सकाळी नोंदलेला पाऊस (मिलिमीटर) सांगली ३ तासगाव १२ पलूस १६ शिराळा ४ मिरज २२.७0 विटा २ आटपाडी ५ कवठेमहांकाळ ८.२0 जत १0 कडेगाव १0.८0 इस्लामपूर ४
कृष्णा नदी पात्राबाहेर
By admin | Published: August 07, 2016 11:54 PM