शिरोळ : पंचगंगेच्या दूषित पाण्याची कृष्णेलाही लागण झाली आहे. त्यामुळे पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढती जलपर्णी त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने निर्माण झाला आहे. शासनानेदेखील नदी प्रदूषण मुक्तीची आश्वासने दिली आहेत. मात्र, तात्पुरती उपाययोजना अशीच मलमपट्टी झाल्यामुळे दरवर्षी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न समोर येत आहे.केवळ दूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात ८२ टक्के रुग्ण आहेत. दूषित पाण्यामुळे २५ टक्के शेती उत्पन्नाचे, २० टक्के दूध उत्पादनाचे आणि जनावरांच्या आरोग्याचे देखील नुकसान होत असल्याची बाब पुढे आली आहे. कोल्हापूर, इचलकरंजी शहराबरोबरच नदीकाठच्या गावातील सांडपाणी, उद्योग व्यवसायाचे दूषित पाणी हा प्रामुख्याने मुद्दा नदी प्रदूषणामुळे उपस्थित होतो. पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णीने पुन्हा तोंड वर काढले आहे. त्यातच या नदीपात्रात काळेकुट्ट पाणी दाखल झाल्याने आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. पंचगंगेच्या जलपर्णीची लागण कृष्णा नदीलाही झाली आहे. त्यामुळे कृष्णा-पंचगंगा संगम घाटाजवळ जलपर्णी निर्माण होत आहे. पंचगंगेचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. त्यामुळे पंचगंगेपाठोपाठ कृष्णाही दूषित बनत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कागदोपत्री कारवाई पलीकडे काहीच केले जात नाही. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतून येणाºया नद्यांचे पाणी शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाºयाजवळ थांबते. त्यामुळे नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, मैला, रसायनयुक्त पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ज्या गावात चांगल्या शद्धिकरण योजना आहेत त्याठिकाणी याची तीव्रता जाणवत नसली तरी ग्रामीण भागात दूषित पाण्याची तीव्रता जाणवत आहे. पंचगंगेत काळेकुट्ट पाणी, तर कृष्णा नदीपात्रात हिरवट पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे याप्रश्नी आता आश्वासने नकोत, तर ठोस उपाययोजना शासनाने राबवाव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.