कोल्हापूर : एक्सवन रेसिंग लीग ही अत्यंत वेगळ्या पातळीवरील रेसिंग स्पर्धा असून त्यात नरेन कार्तिकेयन, मलेशियन चालक लेक्स यंग, चीनचे फ्रांकी छिंग, एफ वन रेसर टोनी लुईझ, निकी लाडा आणि मतीस अशा दिग्गज रेसरना तोडीस तोड टक्कर देत आम्ही लीगमधील पुढील फेरीत बाजी मारण्यासाठी सज्ज आहोत, अशी माहिती ब्रिटिश फॉर्म्युला वन विजेता रेसर कृष्णराज महाडिक व चित्तेश मंडोडी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.कृष्णराज म्हणाला, आयपीएलच्या धर्तीवर सहा संघांमध्ये विजेतेपदासाठी ग्रेटर नोईडा येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट रेसिंग सेंटरवर पहिली फेरी पार पडली. या फेरीत मी अहमदाबादच्या डी. जी. रेसिंगचे प्रतिनिधित्व करीत चार रेसपैकी तीन रेसमध्ये पोडियमवर प्रथम क्रमांक पटकाविला आहे; तर दुसरी फेरी चेन्नई येथील मद्रास मोटार रेस ट्रॅकवर होत आहे. यात माझ्यासह चित्तेशचीही आमच्या संघात निवड झाली आहे.
प्रत्येक संघात चार चालक आहेत, तर दोन रेसिंग कारद्वारे, लीग पद्धतीने स्पर्धा होत आहे. या रेसमध्ये कौशल्य पणाला लावून आमचाच संघ विजयी होईल. त्याकरिता आम्ही सराव करीत आहोत. या स्पर्धेमुळे देशातील उदयोन्मुख रेसर्सना प्रोत्साहन व लोकप्रियता वाढण्यासाठी मदत होईल.चित्तेश म्हणाला, स्पर्धेची दुसरी फेरी ७ व ८ डिसेंबर रोजी चेन्नईमध्ये होत आहे. अत्यंत आगळीवेगळी व स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी ही नामी संधी आहे. यात मी निश्चितच चांगली कामगिरी करीन.