कोल्हापूर : नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना मराठी भाषेतील ‘रिंगाण’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मंगळवारी नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते व ओडिसातील प्रख्यात साहित्यिक प्रतिभा राय यांच्या उपस्थितीत खोत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.कमानी ऑडिटोरियम येथे झालेल्या सोहळ्यात अकादमीच्या उपाध्यक्षा कुसुम शर्मा, के. श्रीनिवासराव उपस्थित होते. ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक आहेत.'रिंगाण' कादंबरीत जंगलात राहणाऱ्या समुदायाच्या विस्थापित आयुष्याचे चित्रण आहे. मानव आणि निसर्गातील नातेसंबंधांच्या इतिहासाचे हे निवेदन असून, स्वरक्षणासाठी मानवाने निसर्गाशी केलेल्या संघर्षाचा हा वास्तववादी इतिहास आहे. त्यांच्या याच 'रिंगाण' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे मंगळवारी वितरण करण्यात आले.दरम्यान, प्रख्यात कोंकणी लेखक, कवी, अनुवादक प्रकाश एस पर्येंकर यांना ‘वर्सल’ या लघुकथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
साहित्य अकादमी पुरस्काराने कृष्णात खोत सन्मानित; ‘रिंगाण’ कादंबरीसाठी पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 4:09 PM