कोल्हापूर , दि. २४ : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कृष्णात वसंतराव पाटील (मौजे सांगाव) यांची बिनविरोध निवड झाली. सर्जेराव पाटील यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजता राधानगरी-कागलच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली.
दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे सभापतिपदाच्या नावांचा बंद लखोटा घेऊन समितीत आले. त्यांनी संचालकांसमोर कृष्णात पाटील यांचे नाव जाहीर केल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केला. निवड सभेत पाटील यांचे नाव ज्येष्ठ संचालक परशराम खुडे यांनी सुचविले. त्यास विलास साठे यांनी अनुमोदन दिले.
शेतकरी संघाने उभा केलेला तात्यासाहेब मोहिते यांचा पुतळा गोडावूनच्या चौकात बसवून त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभे करण्यासाठी समितीस सहकार्य करावे, असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांना करीत नंदकुमार वळंजू म्हणाले, आतापर्यंतच्या दोन्ही सभापतींनी काटकसरीचा कारभार करीत समितीच्या उत्पन्नात भर घातली. हेच काम कृष्णात पाटील यांच्या हातून होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, कागल तालुक्यातील नेत्यांच्या बळावर समितीच्या हिताविरोधात जर काम कराल तर कडाडून विरोध राहील, असा इशाराही वळंजू यांनी दिला.
संलग्न सर्व घटकांना सोबत घेऊन समितीच्या उत्पन्नवाढीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत सभापती कृष्णात पाटील म्हणाले, धान्यबाजार टेंबलाईवाडी येथे स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मलकापूर, कागल उपबाजारही अद्ययावत करणार आहे. सर्जेराव पाटील, संजय जाधव, सदानंद कोरगावकर, भगवान काटे, बाबा लाड, नाथाजी पाटील, नेताजी पाटील, अमित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सालपे, राजेंद्र मंडलिक, आदी उपस्थित होते. विलास साठे यांनी आभार मानले. पाटील यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
सभापती, उपसभापती कागलचे!उपसभापती आशालता पाटील यांचे म्हाकवे (ता. कागल) गाव, तर सभापतिपदी निवड झालेले कृष्णात पाटील हेही कागल तालुक्यातील आहेत. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती व उपसभापती पदांवर कागल तालुक्यातील संचालकांना संधी मिळाली. कृष्णात पाटील यांचे वडील १९७१ ते ८४ या कालावधीत संचालक होते.
नेत्यांच्या नावावरून मानापमान‘शेकाप’चे अमित कांबळे यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे नाव घेणे टाळले. त्यावर हरकत घेत ‘अमित, राजेंचे नाव घ्या,’ अशा शब्दांत उपसभापतींचे पती ए. डी. पाटील यांनी त्यांना जागे केले; तर सर्वच संचालकांनी मानसिंगराव गायकवाड यांचे नाव घेतले नाही, याची नाराजी त्यांचे समर्थक संचालक शेखर येडगे यांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होती.