कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ‘केएसए’ वरिष्ठ गट फुटबॉल साखळी सामन्यात सोमवारी दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघ यांच्यामध्ये चुरशीचा सामना झाला. त्यात ‘पीटीएम’ने ‘दिलबहार’ संघावर २-१ अशा गोलफरकाने मात करत आगेकूच कायम ठेवली. दुपारच्या सत्रातील सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ ने कोल्हापूर पोलीस संघावर मात केली.
दोन्ही संघ बलाढ्य असल्याने छत्रपती शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी लीगमधील उच्चांकी गर्दी केली होती. दोन्ही संघांनी सामन्याच्या प्रारंभापासूनच आक्रमक खेळीस सुरुवात केली. सामन्याच्या सतराव्या मिनिटाला दिलबहार तालीम मंडळाच्या किरण चौकाशीने गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. या आघाडीनंतर दिलबहार तालीम मंडळ संघाचा आत्मविश्वास दुणावला.
यावेळी दिलबहार समर्थकांनी मैदानात एकच जल्लोष करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा देत मैदान दणाणून सोडले. मात्र, ही आघाडी ‘दिलबहार’ खेळाडूंना काही मिनिटेच राखता आली. या गोलनंतर दुसºयाच मिनिटाला ‘पीटीएम’ संघाने केलेल्या खोलवर चढाईमध्ये अकिमच्या कॉर्नर पासवर हृषिकेश मेथे-पाटील याने गोल करत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. या गोलनंतर मात्र ‘पीटीएम’च्या समर्थकांनी ‘नाद खुळा, पिवळा निळा’अशा घोषणा देत आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविला. मध्यंतरापर्यंत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत होता.
उत्तरार्धात ‘पीटीएम’ व ‘दिलबहार’ दोन्ही संघांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यामध्ये ५६ व्या मिनिटाला ‘पीटीएम’कडून पुन्हा एकदा अकिमच्या पासवर हृषिकेश मेथे-पाटील यांनी संघाचा दुसरा व वैयक्तिकही दुसरा गोल करत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. या गोलनंतर मात्र ‘दिलबहार’ संघाने आघाडी कमी करण्यासाठी तर ‘पीटीएम’कडून आघाडी भक्कम करण्यासाठी खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना अपयश आल्याने सामन्यात ‘पीटीएम’ने २-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. संपूर्ण सामन्यात ‘पीटीएम’चा खेळाडू हृषिकेश मेथे-पाटील यांने आक्रमक चढाया केल्या.दरम्यान, दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ ने कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघावर २-० अशा गोलफरकाने मात केली. त्यामध्ये दिलबहार संघाकडून स्वप्निल भोसलेने २४ व्या, सागर साळवीने ५६ व्या मिनिटाला गोल केला.खेळाडू जखमी : दिलबहार संघाने मध्यंतरानंतर केलेल्या चढाईमध्ये सनी सणगरचा गुडघा पाटाकडील तालीम मंडळाच्या अकिमच्या तोंडाला लागल्याने तो मैदानात कोसळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी समर्थकांनी जोरदार शिवीगाळ करत मैदानात चप्पल फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ‘पीटीएम’ खेळाडूंनी ‘दिलबहार’चा खेळाडू सनी सणगरला रेडकार्ड दाखविण्यासाठी पंचांसोबत हुज्जत घातली. यावेळी मुख्य पंच सुनील पोवार यांनी ‘पीटीएम’चा खेळाडू सैफ हकिमला पिवळे कार्ड तर सनी सणगरला रेडकार्ड दाखविले. त्यानंतर सामना सुरळीत सुरू झाला.