कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित खुल्या गटातील महिला फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यात ‘केएसए’ने भाई माधवराव बागल हायस्कूलवर, तर पोदार इंटरनॅशनल स्कूलने काडसिद्धेश्वर हायस्कूलवर ३-० अशा गोल फरकाने मात करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. आज, गुरुवारी दोन्ही संघांत अंतिम लढत होणार आहे. शाहू स्टेडियमवर बुधवारी पहिला उपांत्य सामना केएसए संघ विरुद्ध भाई माधवराव बागल स्कूल यांच्यामध्ये खेळविण्यात आला. यामध्ये केएसएकडून सुचिता पाटीलने ८ व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ २८ व्या मिनिटाला बागल स्कूलने गोल नोंदवत सामना १-१ अशा गोल फरकाने बरोबरीत केला. संपूर्ण वेळ सामना बरोबरीत राहिल्याने सामन्याच्या निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये केएसएने बागल स्कूलवर ३-२ अशा गोल फरकाने विजय मिळविला. यामध्ये केएसएकडून दीप्ती गायकवाड, मृण्मयी खोत, सुचिता पाटील यांनी अचूक गोल केले, तर ऐश्वर्या हवालदार, मृदल शिंदे यांची संधी हुकली. ‘बागल’कडून मणाली बागडी, आकांक्षा सूर्यवंशीने अचूक गोल केले, तर दीपाली कांबळे, प्रतीक्षा भोसले, योगेश्वरी तुरफी यांची संधी हुकली. दुसरा उपांत्य सामना पोदार इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध काडसिद्धेश्वर हायस्कूल यांच्यामध्ये खेळविण्यात आला. यामध्ये दोन्ही संघांना सामन्याच्या शेवटच्या मिनिटा पर्यंत गोलचे खाते उघडता न आल्याने निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये पोदार स्कूलने ३-० अशा गोलफरकाने विजय मिळविला. पोदार स्कूलकडून रचना पाटील, योशिता पटेल, आर्या घोडखिंडीकर यांनी गोल केले, तर कल्याणी धर्म हिची संधी हुकली. काडसिद्धेश्वर संघाकडून प्रियांका मोरे, आदिका भोसले, प्रतीक्षा मिराठी यांच्या संधी हुकल्या. आजचा सामना केएसए विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल, वेळ : सायंकाळी ४.३० वा.
‘केएसए’-‘पोदार’ आज अंतिम सामना
By admin | Published: March 31, 2016 12:16 AM