कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फु टबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळ ‘अ’चा २-१ असा पराभव केला, तर मंगळवार पेठ फुटबॉल क्लब व उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत राहिली.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी दिलबहार ‘अ’ व बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात लढत झाली. पूर्वार्धात दोन्ही संघांनी वेगवान चाली रचल्या. त्यात नवव्या मिनिटाला ‘बालगोपाल’कडून रोहित कुरणेच्या पासवर अभिनव साळोखेने पहिला गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.
पाठोपाठ ‘दिलबहार’च्या रोमॅरिक याने ३२ व्या मिनिटाला मैदानी गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या ३५ व्या मिनिटास दिलबहार संघाच्या बचाव फळीतील खेळाडू पवन माळीच्या डोक्याला लागून चेंडू थेट गोल जाळ्यात गेला. त्यामुळे दिलबहार ‘अ’वर स्वयंगोल झाला. त्यामुळे सामन्यात बालगोपाल संघाने २-१ अशी आघाडी घेतली.उत्तरार्धात दिलबहारच्या जावेद जमादार, सनी सणगर, रोमॅरिक व सुशांत अतिग्रे यांनी आक्रमक चढाया केल्या, तर ‘बालगोपाल’कडून वैभव राऊत, सूरज जाधव व रोहित कुरणे यांनी आघाडी वाढविण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवले. मात्र, दिलबहारच्या बचावफळीमुळे आघाडी घेण्यास यश आले नाही.
दिलबहारच्या योबेह जेरमने दिलेल्या पासवर रोमॅरिकने गोल करण्याचा अप्रतिम प्रयत्न केला. मात्र, बालगोपालच्या सजग गोलरक्षक व बचावफळीने तो परतावून लावला. प्रतिआक्रमणात बालगोपालच्या वैभव राऊत याने मारलेला फटका गोल पोस्टला लागून मैदानाबाहेर गेला. अखेर २-१ या गोल संख्येवर ‘बालगोपाल’ने सामना जिंकत तीन गुणांची कमाई केली.मंगळवार पेठ फुटबॉल क्लब व उत्तरेश्वर प्रासादिक यांच्यात झालेली लढत संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिली.मंगळवार पेठकडून आदित्य लाड, नितीन पवार, ऋषिकेश पाटील व अक्षय मायणे यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना समन्वय नसल्याने गोल करता आले नाहीत, तर उत्तरेश्वर संघाकडून लखन मुळीक, अजिंक्य सुतार, अक्षय मंडलिक यांनी आक्रमक खेळ केला. मात्र, दोन्ही संघांत समन्वय नसल्याने शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही. अखेरीस हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला.हंगामातील पहिले रेडकार्डउत्तरेश्वर प्रासादिकसंघास गोल करण्याची संधी होती. मात्र, जाणीवपूर्वक मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा खेळाडू आदित्य लाड याने चेंडू हाताने अडविला. त्याला पंच संदीप पोवार यांनी रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. यासह त्याला शिक्षा म्हणून पुढील एक सामना खेळता येणार नाही. आदित्यला पंचांनी दिलेले हे हंगामातील पहिले रेडकार्ड ठरले.