कोल्हापूर : जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ‘केएसबीपी’च्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात फ्लॉवर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ८.३० पर्यंत पोलीस उद्यान येथे होत असल्याची माहिती केएसबीपी व कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली.पित्रे म्हणाले, गेल्या वर्षभरात ‘केएसबीपी’तर्फे कोल्हापुरातील रस्ते व चौकांचे सुशोभीकरण केले. ते सुस्थितीत राहण्यासाठी त्याची योग्य देखभाल ‘केएसबीपी’ कडून केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्वांत उंच व देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ३०३ फूट उंच ध्वजस्तभांची उभारणी व १ लाख चौरस फूट उद्यानाच्या निर्मितीचेही काम ‘केएसबीपी’ने केले आहे.
त्यामुळे पर्यटनवाढीस नवी दिशा मिळाली. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवार (दि. २४) पासून येथील पोलीस उद्यानात फ्लॉवर फेस्टिव्हल होत आहे. या फेस्टिव्हलची सुरुवात ताराराणी चौकातून फ्लॉवर परेड, कार्निव्हलने होणार आहे.
या पत्रकार परिषदेस ‘केएसबीपी’चे सचिव राहुल कुलकर्णी, नर्सरी असोसिएशनतर्फे संतोष लोबो, रसिया पडळकर, विजय मळगे, दीपक सुतार, आर्किटेक्ट संतोष रामाने, आर्किटेक्ट अभिनंदन जाधव, शिल्पकार मंगेश कुंभार, राहुल बहिरशेट, महेश माळी, शेखर वळीवडेकर, राहुल मोरे, आदी उपस्थित होते.फेस्टिव्हलची वैशिष्ट्ये..
- - भव्य चित्ररथ, फुलांनी सजविलेली वाहने, शालेय मुलांचे समूह नृत्य, २४ फूट हत्ती, २० फुटाची बैलगाडी, अनेक आकर्षक व आश्चर्यकारक कलात्मक रचना
- - तज्ज्ञांची भाषणे व सादरीकरण, करिअरच्या नव्या वाटा व त्याबाबत मार्गदर्शन तसेच गृहिणींच्या कलागुणास वाव देणाऱ्या व्यवसायासंबंधी सल्ला व मार्गदर्शन
- -समूह नृत्य, कॉमेडी शो, सुगम संगीत तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम
- -विज्ञान, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, फेस पेंन्टिग तसेच विविध विषयांवर आधारित शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा
- -देशी, विदेशी फुलांनी बनविलेली १२ फूट रुंद व २४ फूट लांब धरणाची प्रतिकृती
- - राजर्षी शाहू महाराजांचा ९ फूट उंचीचा फुलांनी सजविलेला भव्य पुतळा तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावर आधारित फुलांनी केलेली कलात्मक रचना
- -१ लाखाहून अधिक फुलझाडे व १०० हून अधिक फुलांच्या जाती