कोल्हापूर : शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहराच्या प्रश्नांसंदर्भात अनेक महत्त्वाची आश्वासने दिल्यामुळे त्याचा फायदा पक्षाला निश्चितच आगामी निवडणुकीत होऊ शकतो. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन राजकीय खेळी यशस्वी करून दाखविली.
मंत्री शिंदे यांनी प्रलंबित प्रश्नांवर घेतलेली सकारात्मक भूमिका आणि निधीची घोषणा यामुळे शिवसेनेने आघाडी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. क्षीरसागर यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करून हा दौरा घडवून आणलाच. त्याचबरोबर मंत्रिमहोदयांकडून निधीच्या आणि प्रलंबित प्रश्नांच्या घोषणा करवून घेऊन शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिवसेना ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे दाखवून दिले. या दौऱ्याने महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसैनिक पराभवाने खचून जात नाही’ असे वक्तव्य मंत्रिमहोदयांनी करून शिवसैनिकांना बळ दिले. निवडणुकीतील जय-पराजय बाजूला ठेवून क्षीरसागर यांनी या दौऱ्यातून ‘मातोश्री’शी जवळीक, मंत्री शिंदे यांची मर्जी राखून यशस्वी राजकीय खेळी खेळली.
कोल्हापूर शहराची मुख्य मागणी असलेल्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. थेट पाइपलाइन योजनेच्या उर्वरित कामासाठी पाठपुरावा, शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासह ऑडिटोरियम, गारमेंट कॉलेज आदींबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. शाहू समाधीस्थळास ८ कोटींचा निधी, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर ८० कोटीमधील उर्वरित ७१ कोटी रुपये दोन टप्प्यांत देण्यास मान्यता दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निर्माण चौक येथील जागेत प्रस्तावित नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची ग्वाही, शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे गार्डन, नागाळा पार्क येथे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक आणि बॉटनिकल गार्डनसाठी ५ कोटींच्या निधीला मान्यता दिली. एकाच दिवसाच्या या दौऱ्यात मंत्री शिंदे यांच्याकडून कोल्हापूरमधील विविध विकास कामे आणि प्रश्नांवर बैठकांचा धडाका सुरू होता. यावेळी निधीची ग्वाहीही देण्यात आली.