लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविला आहे. त्यातून खासगी रुग्णालयाच्या विरोधात केलेल्या तक्रारी मिटवून घेण्यासाठी डॉक्टरकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या खासगी स्वीय सहाय्यकावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. संशयित उमेश तोडकर असे त्याचे नाव आहे. डॉक्टर कौस्तुभ वसंत वाईकर (वय ४०, रा. अरुणोदय हौसिंग सोसायटी, राजेंद्रनगर) यांनी फिर्याद दिली.
डॉ. वाईकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे, माझे बेलबाग, मंगळवार पेठ येथे प्राईम हॉस्पिटल आहे. रुग्णालयात शासनाची वैद्यकीय सहायता निधी योजना राबविली जात आहे. दि. १० जून २०१५ रोजी रुग्णालयात तेजस ठिक (रा. रत्नागिरी) हा रुग्ण मेंदूच्या आजारावर उपचारासाठी दाखल झाला. त्याच दिवशी शिवसेनेचे कार्यकर्ते रुग्णालयात आले. त्यांनी रुग्णाला डिस्चार्ज पाहिजे म्हणून दादागिरी करून बिल न भरता घेऊन गेले. यासंबंधी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर मी व रुग्णालय प्रशासक विजय शिवाजी हंकारे आमदार क्षीरसागर यांना घडलेला प्रकार व बिलासंबंधी घरी भेटण्यासाठी गेलो असता खासगी स्वीय सहायक तोडकर याने खोटा रुग्ण पाठवून रुग्णालय बंद पाडण्याची दमदाटी केली.
दरम्यान, दि. १३ सप्टेंबर २०१६ रोजी सचिन ज्ञानदेव चव्हाण हा आ. क्षीरसागर यांच्या लेटरपॅडवर मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार करण्यासंबंधी शिफारस घेऊन दाखल झाला. त्यानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचे प्रकरण तयार केले. त्यानंतर चव्हाण हा उपचार न घेताच निघून गेला. शासकीय मंजुरीप्रमाणे चव्हाण याच्या नावे एक लाख रुपये माझ्या रुग्णालयाच्या खात्यावर जमा झाले. त्यावर चव्हाण याने पुन्हा रुग्णालयात येऊन मंजूर झालेल्या पैशांची मागणी केली. मी त्याला रुग्णालयाचे बिल चौदा हजार झाले आहे. ते सोडून उर्वरित पैसे शासनाला जमा करणार असे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी आमदार क्षीरसागर यांचा खासगी स्वीय सहायक तोडकर याचा फोन आला. चव्हाणला निम्मे व आम्हाला निम्मे पैसे देण्यासाठी दमदाटी केली; परंतु मी सर्व पैसे शासनाला जमा केले. त्यामुळे तोडकरने रुग्णालयाची चौकशी होऊन मान्यता रद्द करण्यासाठी आ. क्षीरसागर यांच्या लेटरपॅडवर महापालिका आरोग्य विभागाला अर्ज केला. त्यानुसार चौकशी झाली असता कोणताही गैरप्रकार आढळला नाही. त्यानंतर तोडकर पुन्हा राजीव गांधी जिल्हा सन्वयक डॉ. अशोक देठे यांच्यासोबत रुग्णालयात आला. शासकीय योजनेतून मोठा आर्थिक फायदा झाला आहे. रुग्णालयाच्या विरोधात तक्रारी आहेत, त्या मिटवायचे असतील तर पाच लाख रुपये द्या, अन्यथा रुग्णालय बंद पाडण्याची धमकी दिली. तोडकरपासून माझ्या जिवाला धोका असून तो पैशांसाठी काहीही खोट्या तक्रारी करू शकेल, या भीतीपोटी मी तक्रार देत आहे.