तसे हे गाव कोल्हापूरच्या उत्तरेकडील वेशीवर. गाव तसं एकदम इरसाल. त्यामुळे लोकही तितकेच बेरकी. त्यामुळे काहीतरी वेगळी शक्कल लढवणार... दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. गावातील एक ऑडिटर लाच घेताना सांगलीत सापडले. त्याची बातमी दुसऱ्यादिवशी पेपरात झळकणार, हे माहीत झाल्यावर ऑडिटर महाशहांनी यंत्रणा कामाला लावली व गावाच्या वेशीवरच वृत्तपत्र विक्रेत्यांना अडवून दोन-तीन गावांत कोणतेच पेपर जाऊ नयेत, याची फिल्डिंग लावली. पण ‘जो बूंदसे गयी... हौदसे नहीं आती’ हे त्यांना कोण सांगणार, अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू होती.
कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले...
तशी ही गंगावेशमध्ये मुख्यालय असलेल्या बँकेची जुळी बहीण असलेली बँक. संचालक मंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली. तिथे म्हणे लिपिक भरती झाली. त्याबद्दल तक्रारी झाल्यावर बँकेचे प्रमुख अधिकारी रजेवर गेले. तोपर्यंत असिस्टंटने नेमणूक पत्रे दिली. त्याबद्दल जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार झाली. त्यांनी दोन नोटिसा लागू केल्या. गंगावेशीतील बँकेच्या ज्येष्ठ संचालकाने बैठक घेऊन नोकरभरतीचे प्रकरण वाढवू नका, असे बजावले. संचालकांनी जाता-जाता डल्ला मारला तरी, आता या भरतीवर जिल्हा उपनिबंधक काय कारवाई करतील का, या भीतीने कर्मचाऱ्यांच्या तोंडचे मात्र पाणी पळाले आहे.