इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील मागाडे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी व ग्रा. पं. सदस्य कुमार मारुती कांबळे (वय ४२) याच्यासह चौघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. २३ जानेवारीला राजकीय वादातून झालेल्या संदीप सुरेश मागाडे (२७, रा. भीमराज भवनजवळ, कबनूर) याच्या खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कुमार कांबळे याच्यासह संकेत ऊर्फ अनिकेत अनिल शिंदे (१९), राकेश ऊर्फ आकाश अनिल शिंदे (२०) या तिघांना रविवारी (दि. ७) अटक केली होती, तर त्याचा चुलत भाऊ रवी सुरेश कांबळे (२८, रा. सिद्धार्थनगर) याला मध्यरात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यामुळे या चौघांना सोमवारी न्यायालयात हजर केले. या प्रकरणात आजपर्यंत बाराजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
चौकट
सरपंच निवडीत सहभाग नाही
कबनूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीचा कार्यक्रम आज, मंगळवारी आहे. मात्र, मागाडे याच्या खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून पोलीस कोठडीत असल्याने ग्रा. पं. सदस्य कुमार कांबळे याला या निवडीमध्ये सहभागी होता येणार नाही.