नाना जाधव -भादोले --वारणा व परिसरातील प्रसिद्ध असणारे भादोलेचे लेझीम पथक नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात झळकले. त्यांच्या हलगी ठेक्याने व लेझीमच्या प्रात्यक्षिकाने भारताच्या काना-कोपऱ्यातून आलेल्या साधू महंताबरोबरच भाविकांची मते जिंकून घेतली.अधिक माहिती अशी, येथील लेझीममधील विविध प्रकार व प्रात्यक्षिक हलगी, लेझीम, झांज यांचा आवाज, वाजविण्याचे कौशल्य अशा विशिष्ट बाबींमुळे भादोले येथील हनुमान लेझीम पथक वारणा खोऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे. नेर्ले येथील ‘जय गुरुदेव जंगली महाराज’ यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातून या लेझीम पथकाला निमंत्रण दिले होते. हे मंडळ नाशिक कुंभमेळ्यात चार दिवस सहभागी झाले होते. या पथकामध्ये पारंपरिक हलगी, लेझीम, घुमके, झांज या वाद्यांसह ५० युवक सहभागी झाले होते. ‘जय आत्मा मालिक’ मठाच्या साधूंच्या मिरवणुकीमध्ये पंचवटी ते रामकुंड दरम्यान मंडळांतर्फे लेझीमचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दरम्यान, हलगी घुमकेचा आवाज हा महाराष्ट्र सोडून इतर राज्यांसाठी इतका परिचित नव्हता.अनेकांनी ठेका धरला. सर्वांत जास्त गर्दी या लेझीम पथकाभोवती होती. अनेकांनी बक्षीसही दिले. या मंडळामध्ये महादेव पाटील, सर्जेराव पाटील, प्रकाश पोवार, अजित पाटील यांच्यासह ५० युवकांनी सहभाग घेतला.
कुंभमेळ्यात कडाकली भादोलेची हलगी
By admin | Published: September 21, 2015 11:37 PM