कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. शाहूवाडीच्या दक्षिण भागामध्ये प्रवासी वाहतुकीचे एकमेव माध्यम असलेली एस. टी. सेवा अद्याप बंद आहे.
कासारी खोऱ्यात सामान्य प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एकमेव आधार असलेल्या एस.टी. बसच्या रंकाळा बुरंबाळ व कुंभवडे सकाळी तसेच मुक्कामी फेऱ्या सुरू करणे आवश्यक आहे. दुपारची फक्त रंकाळा-चौकेवडी ही एकच फेरी सुरू आहे. अद्याप एस. टी. सेवा सुरळीत झालेली नाही. इयत्ता नववीपासून पुढे शाळा व कॉलेज सुरू झाले आहेत. या भागातून कोल्हापूर, कळे, बाजारभोगाव, करंजफेण येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी शालेय, तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतले आहेत; पण वाहतुकीची काहीच सोय नसल्याने विद्यार्थी मात्र घरीच आहेत. त्याचे खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. दैनंदिन रोजगार, कार्यालयीन कामकाज यांसाठी प्रवास करणाऱ्यांची खूपच गैरसोय झाली होत आहे. त्यामुळे एस. टी. सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी होत आहे.