प्रकाश पाटील
कोल्हापूर - कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखाना या वर्षी ३०४५ रूपये प्रति टन एकरकमी एफआरपी देणार आहे. स्वर्गीय डी सी नरके यांच्या शेतकरी, कामगार, ऊस तोडणी वाहतूकदार यांच्या हित सांभाळण्याचे दिलेल्या तत्वावर आमची वाटचाल सुरू असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष माजी आमंदार चंद्रदीप नरके यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
आज ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपण कार्यक्रमात चंद्रदीप नरके बोलत होते. संचालक विलास पाटील व त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष नरके म्हणाले, "एफआरपी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. पण एफआरपी ठरवताना त्या पासून तयार होणाऱ्या साखरेला मिळणाऱ्या हमी भावाची सरकार कडून कोणतीच तजवीज केली जात नाही. गेल्या चार वर्षांपासून साखरेला मिळणारा दर व एफआरपी यात मोठी तफावत आहे. कुंभी कासारी कारखान्यावर आर्थिक संकटे आली तरी शेतकरी सभासद, कामगार व तोडणी वाहतूकदार यांना शासन ज्या सोयी सवलती जाहीर करेल त्या दिल्या आहेत.
महाराष्ट्रात सहकारी तत्वावरील कारखाने हे शेतकऱ्यांचेच आहेत. ते शेतकऱ्यांच्या मालकीचे राहणे काळाची गरज आहे. यासाठी शासनाने ३६ रूपये साखरेला हमी भाव द्यावा अशी मागणी नरके यांनी केली. ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी आपला पीकवलेला सर्व कारखान्याला पुरवठा करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील, शेती अधिकारी संजय साळवी, मुख्य अभियंता संजय पाटील, चिफ केमिस्ट प्रकाश पाटील उपस्थित होते.