लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे: कुंभीची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यात अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सहकारी साखर कारखानदरीसमोर असलेल्या अडचणींचा पाढा वाचला. हाच धागा पकडून ज्येष्ठ सभासदांनी कुंभीची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. यामुळे होऊ घातलेली निवडणूक बिनविरोधसाठी कवाडे खुली झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. याला गोकूळच्या निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात असून गोकूळच्या निवडणुकीने कुंभीच्या वार्षिक सभेचीही धारच बोथट झाल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी कुंभीच्या वार्षिक सभेत शाहू आघाडीच्यावतीने गोकूळचे संचालक बाळासाहेब खाडे कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील राजेंद्र सूर्यवंशी कुंभी बचाव मंचचे बाजीराव खाडे प्रकाश देसाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील संजय पाटील एस. के. पाटील बदाम शेलार हे प्रमुख संचालक मंडळाला विविध विषयावर खिंडीत पकडून धारेवर धरत होते. वरील नेते कोणत्या विषयावर संचालक मंडळाला खिंडीत पकडू शकतात याची चाचपणी करून सत्तारूढ गट सभेतची तयारी करून येत असे. विरोधकांच्या कडून वार्षिक सभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत सभासदांमध्ये गट-तट विसरून मोठी उत्सुकता पाहायला मिळत होती.
पण चर्चा सुरू असताना प्रास्ताविक भाषणात अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी साखर विक्री ठप्प आहे, एकरक्कमी एफआरपीचा दट्या आहे. यामुळे कर्जे काढून देणी द्यावी लागत आहेत. याचा परिणाम कुंभी कासारी कारखान्यालाही आर्थिक अडचणी येत आहेत विरोधी गटाने एक शेतकऱ्यांची संस्था म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन केले. नेमका हा धागा पकडून विरोधी गटाच्या टी.एल. पाटील व शेतकरी संघटनेच्या दादूमामा कामिरे यांनी येणारी निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव ठेवला. यामुळे विरोधी गटाबरोबर सत्ताधारी गटातही मोठे आश्चर्याचा भाव निर्माण झाला. पण सर्वांनी सावरत दुसऱ्याच मिनिटात सत्ताधारी गटाकडून अध्यक्ष नरके यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले तर विरोधी गटाकडून ही सूचना येण्याला कारण आपला कारभार असल्याचे सांगत वेळ मारून नेली
विरोधी सर्वच नेत्यांनी रविवारी दि. १४ च्या ऑनलाईन सभेत साधी उपस्थितीही दाखवली नाही. गोकूळ निवडणूक आर्थिक अडचण अशा अनेक समस्या समोर असल्याने विरोधकच निवडणूक बिनविरोध करण्याच्या सूचना करत असल्याने विरोधकांचे कुंभी कासारी कारखान्यातील अस्तित्व क्षीण होत असल्याचे चित्र आहे.