कुंभोज,दि.१(वार्ताहर) : शुक्रवारी कुंभोज ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी होणारी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आयोजित बैठकीत चिठ्ठ्या टाकून उमेदवार निवडण्याला विरोध दर्शवून इच्छुकांसह समर्थकांनी बिनविरोधचे सर्व अधिकार नेत्यांकडे दिल्याने उमेदवार निवडीचे दिव्य आता गटनेत्यांनाच पार पाडावे लागणार आहे. यासाठी आता सर्व प्रमुख नेत्यांची कसोटी लागणार आहे. गतवेळी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीत मात्र बक्षिसाच्या रकमेतून गावात विकासकामे करण्याच्या उद्देशातून बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू आहेत.
शुक्रवारी रयत गुरूकुल संकुलामध्ये झालेल्या बैठकीत सर्व जागा बिनविरोध होत असतील तर काॅंग्रेसचे किरण माळी यांच्यासह दहाहून अधिक इच्छुकांनी गावहितासाठी बिनशर्त माघार घेण्याची तयारी दर्शविली. अनेकांनी आजवर गावातील मूलभूत प्रश्न न सुटल्याची खंत व्यक्त करून त्यासाठी बिनविरोधमध्ये आपली वर्णी लागावी, असाही अप्रत्यक्ष आग्रह नेत्यांकडे धरला. तर नेत्यांच्या घरातील उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत मग आमचे घेऊ, असेही दोघा इच्छुकांनी सांगितले. तरुणांसह ज्येष्ठ व अनुभवींना संधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी प्रत्येक प्रभागातील प्रमुखांनी एकमताने बिनविरोधसाठी नावे सुचवावीत, असे आवाहन करताच गटनेत्यांनीच आरक्षणानुसार सर्वसमावेशक सतराजणांची निवड करावी, अशी एकमुखी मागणी उपस्थित कार्यकर्ते, उमेदवार, ज्येष्ठ नागरिक तसेच समर्थकांनी केली.
निवडणूक बिनविरोध होईल पण करावा लागलाच तर घरच्या उमेदवारीचा त्याग, तडजोडीसाठी खर्चावी लागणारी प्रतिष्ठा, वापरावी लागणारी अधिकार वाणी या सर्व गोष्टी अरुण पाटील यांच्यासह अन्य सर्वपक्षीय नेतेमंडळी कशा हाताळतात, यावरच सर्वकाही अवलंबून आहे. या बैठकीला जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, किरण माळी, सदाशिव कुलकर्णी, माजी सरपंच प्रकाश पाटील, किरण नामे, बापूसो पाटील, सुभाष देवमोरे, बाळासो कोले, आदी प्रमुख नेते तसेच इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.