कोल्हापूर : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. बालकांमध्ये विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी जिल्हास्तरावर डॉ. संगीता कुंभोजकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे आदेश काढले.
या समितीचे सदस्य म्हणून डॉ. अनिल कुरणे, डॉ. व्यंकटेश तरकसबंद, डॉ दशावतार बडे, डॉ. मंदार पाटील, डॉ. युवराज पाटोळे, डॉ. रवी पवार, डॉ. भूषण मिरजे, डॉ. रुचिका यादव हे काम करणार आहेत. या टास्क फोर्सकडून जिल्ह्यातील सर्व रुग्णालये व जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना व त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य केले जाईल. सर्व कोविड रुग्णालयात बालरुग्णांसाठीच्या आवश्यक एनआयसीयू, आयसीयू बेड, व्हेटिंलेटर या सुविधा व स्वंतत्र कक्ष निर्माण करणे, बालकांवरील उपचारांसाठी शासनाकडील मार्गदर्शक सूचना व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन तयार करणे, डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती अशा जबाबदाऱ्या पार पाडण्यात येणार आहेत.
--
कोविड केंद्रांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर व समर्पित कोविड रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी हेमंत निकम व हर्षला वेदक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सुनील घाग व विनोद वस्त्रे हे सहकार्य करणार आहेत.
---