कुंभोज : डीजेच्या जमान्यात सनई चौघडा, बँडपथक, हलगी, घुमके यांचे महत्त्व थोडे कमी झाले तरी ग्रामीण भागात आजही विविध वाद्यांना लोकाश्रय कायम आहे. पारंपरिक धनगरी ढोलवादनाचा दणदणाट आजही गावा-गावांतून निमित्ताने का असेना, पण अधून-मधून कानी पडतोच. एव्हाना गल्ली, बोळात अन् गावात घुमणारा धनगरी ढोल आता कुंभोजच्या शिवाजीचा धनगरी ढोल अमेरिकेसह पन्नास देश़ांत दणाणणार आहे.पारंपरिक ढोलवादनाची पर्वणीच जणू पाश्चात्त्य देशांना मिळणार आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविलेल्या कुपवाड (जि. सांगली) येथील मुरसिद्ध वालूग आणि ओवीकार मंडळाच्या अमेरिकेत जाणाऱ्या चाळीस सदस्यांपैकी कुंभोजचा शिवाजी पालखे हा एक आहे.लोकसभा सभापती सन्मानित आंतरराष्ट्रीय पारंपरिक धनगरी ढोलवादन कलाकार अर्थात मुरसिद्ध वालूग व ओवीकार मंडळ (कुपवाड) यांना वर्ल्ड कॉन्स्टुटुशन अँड पार्लमेंट (अमेरिका) यांच्याकडून वालूग मंडळास सभासदत्व आहे. पुढील काही दिवसांत अमेरिकेसह पन्नासदेशांत होणाºया इव्हेंटमधून कुपवाडच्या धनगरी ढोलवादन व ओवीकार मंडळास पारंपरिक ढोलवादन कला सादर करण्याची अपूर्व संधी मिळणार आहे. अर्थातच कुंभोजच्या शिवाजीचा ढोल-कुडापण्याचा आवाज विलायतीत घुमणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात इव्हेंटचे वेळापत्रक निवडकर्त्यांना मिळणार आहे.केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शिवाजीच्या अफलातून ढोलवादनाच्या कलेला मुरसिद्ध वालूग मंडळाचे अध्यक्ष बाळासो मंगसुळे यांनी पारखल्याने शिवाजीस आज अमेरिकेत आपली कला सादर करण्याची नामी संधी मिळाली. शिवाजीच्या कलेची कदर पाश्चात्त्यांनी केल्यामुळे त्याच्या निवडीच्या बातमीने त्याचे कुटुंबीय आनंदून गेले असून, कुंभोजातील ढोलवादन व ओवीकार मंडळांबरोबरच समस्त धनगर समाज बांधवांतून शिवाजीच्या निवडीबद्दल अभिमान व्यक्त होऊ लागला आहे.
कुंभोजचा धनगरी ढोल घुमणार अमेरिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:32 AM