अशोक खाडे --- कुंभोज --जिल्हा परिषद मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) साठी आरक्षित झाला आहे. नव्याने निर्माण झालेल्या लाटवडे पं. स. मतदारसंघातही हेच आरक्षण असल्याने मतदारसंघातील ‘ओबीसी’ नेते, कार्यकर्ते, तसेच मतदारांमध्ये चैतन्य पसरले आहे. कुंभोज पंचायत समिती मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने येथे निरुत्साह आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने सर्वप्रथम ठोकलेला शड्डू, काँग्रेसची वेळेवर सुरू झालेली राजकीय मशागत, पक्षीय पातळीवरील अद्यापही अधांतरी झालेल्या युत्या, जनसुराज्यची गुलदस्त्यातील उमेदवारी, अशा परिस्थितीत इथल्या जनसुराज्यच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस, शिवसेना, तसेच आयत्यावेळी एका अपक्षाचे आव्हान निर्माण होण्याचे संकेत मिळत असून, तेथे चुरस आणि प्रतिष्ठेची चौरंगी लढत दृष्टिक्षेपात येत आहे. मात्र सर्वांना जनसुराज्यच्या उमेदवारीची उत्कंठा आहे. सन २०१२ मध्ये कुंभोज जि. प.साठी जनसुराज्य, काँग्रेस व स्वाभिमानी दरम्यान झालेल्या तिरंगी लढतीत माजी आमदार राजीव आवळे यांच्या पत्नी स्मिता आवळे, तर खोचीमधून ऐश्वर्या अजय पाटील यांनी विजय संपादन करून जनसुराज्यचा गट शाबूत राखला, कुंभोज पं. स.ची जागा जनसुराज्यने गमावली. येथे अपक्ष संतोष माळी यांनी अनक्षेपितपणे मुसंडी मारली. कुंभोज जि. प. मतदारसंघ प्रदीर्घ काळानंतर ‘ओबीसी’च्या वाट्याला आल्यामुळे जि. प. व लाटवडे पं. स.साठी लढण्यास इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शिवसेनेचे आम. डॉ. सुजित मिणचेकर फाऊंडेशेनचे अध्यक्ष प्रवीण यादव यांची उमेदवारी जाहीर करून पहिला शड्डू ठोकला आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसने लाटवडेचे अशोक माळी यांना रिंगणात उतरून उमेदवारीबाबतला पूर्णविराम दिला. जनसुराज्यने आपली उमेदवारी निवड अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. जनसुराज्य-भाजप आघाडीतून किरण माळी सुरुवातीपासूनच प्रबळ इच्छुक आहेत. त्याशिवाय पं. स. सदस्य संतोष माळी, शकील मुलाणी, राजू घोदे, जहाँगीर हजरत हे सर्वजण जनसुराज्यमधून लढण्यास आग्रही आहेत. ‘भाजप’चे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष बी. एस. गारे इच्छुक आहेत. कुंभोजची जागा भाजपला घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादांकडे प्रयत्न करीत आहेत. पं. स. सदस्य संतोष माळी मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेऊन लढणार हे मात्र निश्चित आहे. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष राहून गत पंचवार्षिकमध्ये कुंभोज पं. स. साठी अपक्ष लढून दाखविलेल्या चमत्काराची पुनरावृत्तीचा मनसुबा त्यांनी बाळगला आहे. स्वाभिमानी संघटनेकडून रवी कागवाडे, चंद्रकात वाकसे, जालिंदर कोळी इच्छुक आहेत. हिंगणगावचे माजी सरपंच संजय देसाई यांचे नावही पुढे येण्याची शक्यता आहे. अनु. जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने कुंभोज पं. स. मतदारसंघात पक्षीय गोटात शांतता आहे. तेथून सेवानिवृत्त शिक्षिका रत्नमाला दत्तात्रय देवमोरे, सपना पांडव, सोनाली कोळी यांची नावे चर्चेत आहेत. नव्याने अस्तित्वात आलेल्या पं. समितीच्या लाटवडे मतदारसंघात ना. मा. प्रवर्ग पुरुष जागेसाठी आप्पासो कोळी, हर्षवर्धन चव्हाण, वसंतराव गुरव, प्रवीण वाकसे, किरण माळी, बंडा बंडगर, ईलाई देसाई, सलीम जमादार हे मातब्बर इच्छुक आहेत. कुंभोज व लाटवडेत अजून कोणत्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. भाजप-जनसुराज्य आघाडीस आणखी कोणाची ताकद मिळणार का? स्वाभिमानी कोणाला साथ देणार? ताराराणी आघाडी कुंभोजमध्ये उमेदवार देणार काय? शिवसेनेला कोणाकोणाची मदत होणार? या सर्व घडामोडींवर इथली लढत वळण घेणार आहे.एकंदरीत कुंभोजच्या जि. प. आखाड्यात जनसुराज्य गड शाबूत राखण्यास, शिवसेना आम. सुजित मिणचेकर यांच्या प्रतिष्ठेची लढत जिंकण्यास, काँग्रेस मतदारसंघावरील मूळची पकड घट करण्यास, तर स्वाभिमानी आपली ताकद दाखविण्यासाठी येथील तिन्ही लढती प्रतिष्ठेच्या मानून जिवाचे रान करणार, हे मात्र नक्की. कुंभोज जि. प. समाविष्ट गावे व मतदान - कुंभोज-दुर्गेवाडी-१०२४७, खोची-४३९४, लाटवडे-४१७३, मिणचे - ३५५९, भेंडवडे - ३३३०, नेज - ३१२९, वाठार तर्फ उदगाव २३७४, हिंगणगाव - १४९३.कुंभोज जि. प. साठी इच्छुक प्रवीण यादव (शिवसेना), अशोक माळी (काँग्रेस), संतोष माळी, किरण माळी, शकील मुल्लाणी, राजाराम घोदे, विनायक पोतदार (जनसुराज्य), बी. एस. गारे (भाजप), रवी कागवाडे, चंद्रकांत वाकसे, जालिंदर कोळी, सचिन कोळी (स्वाभिमानी), संजय देसाई.
कुंभोजला प्रतिष्ठेची चौरंगी लढत, जनसुराज्यच्या उमेदवारीची उत्कंठा
By admin | Published: January 04, 2017 12:11 AM