राजाराम लोंढे कोल्हापूर : कुंभी-कासारी साखर कारखाना स्वर्गीय डी. सी. नरके यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच सुरू असून, कारखाना ‘सक्षम’ आहे. व्यक्तिद्वेषातून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी चांगल्या कारखान्याची बदनामी सुरू असून, आरोप करणाऱ्यांच्या नेत्यांनी त्यांच्या कारखान्यात काय दिवे लावले, हे जनतेला चांगले माहिती आहे. त्यामुळे ‘कुंभी’ वाचविण्याची भाषा करणाऱ्यांनी आपल्या पायाखाली काय जळतं ते आधी पाहावे, असा पलटवार सत्तारूढ पॅनलचे नेते, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला.नरके म्हणाले, एकीकडे ‘कुंभी बचाव’ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याला ऊस घालू नका म्हणून सांगायचे, हे कसले राष्ट्रीय नेते? साखर निर्यातीचा योग्य निर्णय आणि चांगल्या व्यवस्थापनामुळेच पंधरवड्याला उसाची बिले देतोय. २०१७-१८ मधील एफआरपीपेक्षा अधिकचे शंभर रुपये दिले. ज्यांनी हे पैसे दिले नाहीत, तीच मंडळी आता ‘कुंभी’ची मापे काढत आहेत.विराेधक सहा लाख एक हजार ३२२ क्विंटल साखर ठेवून सत्ता सोडल्याची वल्गना करतात. या साखरेचे मूल्यांकन ८६.६४ काटी होते आणि त्यावर ७९.३१ कोटी कर्ज काढले होते. इतर देणीसह २६.६६ कोटींचा संचित तोटा केल्यानेच सभासदांनी त्यांना घरी बसविले. या मंडळींची निम्म्यापेक्षा अधिक देणी आम्ही सत्तेवर आल्यावर भागवली. त्यांच्या काळात नक्त मूल्य उणे १७ कोटी होते. आता ते अधिक १८ कोटी आहे. यावरूनच कारखाना कोणी चांगला चालविला हे लक्षात येते.जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची एफआरपीसाठी घेतलेली कर्जे ८० ते ५०० कोटींपर्यंत आहेत. साखरेचे दर वाढत जातील, तशी या कर्जांची परतफेड होते.‘वीज प्रकल्पातून ५.६६ कोटी नफा’कारखान्याचा सहवीज प्रकल्प व कारखाना आधूनिकीकरण करण्यासाठी ११२ कोटींचे कर्ज काढले. गेल्या नऊ वर्षांत या कर्जाची परतफेड करून ५.६६ कोटींचा नफा झाला. या नफ्यातूनच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना एफआरपी देता आल्याचे नरके यांनी सांगितले.खाडेंनी राजीनामा तयार ठेवावाचुकीचे बोल पण रेटून बोलण्याची प्रवृत्ती असलेले बाळासाहेब खाडे यांनी ‘कुंभी’च्या कर्जाबाबत केलेले आरोप चुकीचे निघाले तर ‘गोकुळ’च्या संचालक पदाचा राजीनाम्याचा ‘पण’ केला आहे. हे आरोप खोटे असून, त्यांचा ‘पण’ लवकरच पूर्ण होणार असून, त्यांनी राजीनामा तयार ठेवावा, असा टोला चंद्रदीप नरके यांनी लगावला.‘कुंभी’ची पत म्हणूनच जिल्हा बँकेचे कर्जकुंभी कारखान्याच्या सांगण्यावरून नव्हे, तर आर्थिक पत असल्यानेच जिल्हा बँकेने कर्ज दिले. त्याचे हप्ते आम्ही वेळेत परतफेड केले. आमच्यावर बोलणाऱ्यांच्या नेत्यांच्या कारखान्याला दिलेल्या कर्जाची परतफेड कशी होते? हे तपासावे, असा टोला नरके यांनी लगावला.एक दिवस तुमचेही हात पोळतीलभावाभावात भांडणे लावून स्वत:ची राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे एक दिवस हात पोळणार आहेत. सत्तेसाठी खालच्या दर्जाचे राजकारण करणाऱ्यांना सभासद धडा शिकवतील, असे नरके यांनी सांगितले.यांच्या घरात ‘गोकुळ’चे कर्मचारी किती‘गोकुळ’मधील सत्तेचा वापर विधानसभा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करणाऱ्यांना नैतिक अधिकार काय? आमची मापे काढणाऱ्यांच्या घरात ‘गोकुळ’चे कर्मचारी किती? तेथील सत्ता राजकारणासाठी वापरली नाही काय? राजकीय सत्तेची सहकाराला जोड देऊन विकास करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो, असे नरके यांनी सांगितले.
कुंभी कारखाना भक्कमच; पी.एन.पाटलांनी त्यांच्या कारखान्यात काय दिवे लावले?, चंद्रदीप नरकेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 4:04 PM