इंदुमती सूर्यवंशी /कोल्हापूर: सकाळची प्रसन्नता, मंजुळ सुरावटी, करवीर निवासिनी श्री अंबा माता की जयचा गजर, मंत्रोच्चार अशा सुमंगल वातावरणात रविवारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित कुंकुमार्चन सोहळा उत्साहात पार पडला. श्री राममूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्री रामाची व मंदिराची भव्य प्रतिकृती लावण्यात आली होती. या सोहळ्यात ५ हजारांवर महिलांनी सहभाग घेतला.
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने गेल्या १० वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. श्री अंबाबाई मंदिर ते भवानी मंडप परिसरात हा सोहळा पार पडला. यामध्ये मधुरिमाराजे छत्रपती यांनी सहभाग घेतला. वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकुमार्चन विधी झाला. यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. मध्यभागी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसेच श्रीरामाची व राम मंदिराची भव्य प्रतिकृती लावण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली.
यावेळी सर्व महिलांनी केशरी रंगाच्या साड्या परिधान करून साजशृंगार करून आल्या होत्या. सकाळच्या प्रसन्न, भक्तीमय वातावरणात व मंत्रोच्चारात कुंकुमार्चन सोहळ्याला प्रारंभ झाला. यासाठी हळदीकुंकू, श्री देवीच्या पादुका संस्थेच्या वतीने देण्यात आल्या. तसेच रामरक्षा पुस्तिका व हेल्थकार्ड देण्यात आले. लकी ड्रॉद्वारे भरघाेस बक्षिसे देण्यात आली. यानंतर महिलांना प्रसाद वाटप झाले. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जोशी, राजू सुगंधी, एस. के. कुलकर्णी, तन्मय मेवेकरी, आदित्य मेवेकरी, सुनील खडके, चंद्रशेखर घोरपडे, भूषण पाठक, प्रसाद जोशी, ऋतुराज सरनोबत यांनी संयोजन केले.