कोल्हापूर : कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती ठरविण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि समितीचे इतर सदस्य २२ नोव्हेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहेत. ही समिती कोल्हापूर जिल्ह्यात २८ नोव्हेंबरला येत आहे. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा आढावा ते घेणार आहेत.अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेले उपोषण, शासनाने महसूल नोंदी तपासण्याचे सुरू केलेले काम, या सगळ्या पार्श्वभूमीवर शासन नियुक्त समिती राज्याचा दौरा करून आढावा घेणार आहे. या समितीचे अध्यक्ष व समितीचे सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसूल विभाग आणि सर्व जिल्ह्यांत आढावा बैठक घेऊन भेटी देणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, करार, दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज समितीस उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन या समितीने केले आहे.समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे :२८ नोव्हेंबर : सकाळी १०.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोल्हापूर. (कोल्हापूर आणि सांगली)२९ नोव्हेंबर : सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे. (पुणे, सातारा व सोलापूर)११ डिसेंबर : सकाळी १०.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग नगरी, ओरोस. (सिंधुदुर्ग व रत्नागिरी)
कुणबी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती शिंदे २२ नोव्हेंबरपासून राज्य दौऱ्यावर, २८ ला कोल्हापुरात
By संदीप आडनाईक | Published: November 18, 2023 7:06 PM