भीमगोंड देसाईकोल्हापूर : शासनातर्फे कुणबी नोंद शोधमोहिमेमुळे कुणबी दाखला मिळवणे सोपे झाले आहे. एका नोंदीमुळे थेट रक्तसंबंधातील सर्व नातेवाइकांना दाखला मिळणार आहे. यासाठी रितसर अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोत वंशावळ (वडील, आजोबा, पणजोबा) काढून ती पुराव्यानिशी जुळवावी लागणार आहे. याशिवाय आवश्यक कागदपत्रे जोडल्यास प्रांताधिकाऱ्यांकडून दाखला दिला जात आहे.कुणबी नोंद शोधमोहिमेनंतर गावनिहाय नावानिशी माहिती जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कुणबी दाखला काढण्यासाठी सापडलेल्या नोंदीचा पुरावा म्हणून वापर करता येणार आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइक (तुमचे वडील / चुलते / आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते / आत्या, आजोबांचे चुलते / आत्या, पणजोबांचे चुलते / आत्या, खापर पणजोबांचे चुलते / आत्या आदी.) यापैकी कुठल्याही एका नातेवाइकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. यापैकी एकाची जरी कुणबी नोंद आढळल्यास सर्व रक्तातील नात्यांना दाखला मिळणार आहे.
दरम्यान, सध्या मोहिमेत कुणबी नोंद शोधण्यासाठी रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश किंवा शाळा सोडल्याचा दाखला पाहिला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्म-मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीतही कुणबी नोंद शोधली जात आहे.जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदीतही जातीचा उल्लेख आढळतो. रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा दाखल्यासाठी चालतो. म्हणून या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
दाखला काढण्यासाठी झुंबड उडणार
गावनिहाय नावे जाहीर केल्यानंतर मोहिमेत १० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात १४ हजार १८४ कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, त्या कोणत्या गावातील आहेत. त्यांची नावे काय आहेत, हे अजूनही प्रशासनाने जाहीर केलेले नाही. आता तर रोज सापडणाऱ्या नोंदीची संख्याही गोपनीय राखली जात आहे. ही सर्व माहिती नावनिहाय जाहीर झाल्यानंतर कुणबीचा दाखला काढण्यासाठी झुंबड उडणार आहे.आत्याचा नवरा, मुलांना नाही..वडिलांची कुणबी म्हणून नोंद आढळल्यास मुलगा, मुलगी आणि आत्याला दाखला मिळणार आहे. पण आत्याचा नवरा आणि मुलांना दाखला मिळणार नाही.