कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीस मूळ जागी स्थापना करून तीनशे वर्षे झाली. योगायोगाने यंदा मूर्तीस संवर्धन विधी झाला. यासह संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी सात वाजता अंबाबाई मंदिर पूर्व दरवाजा परिसरात अंबाबाई देवी कुंकुमार्चन सामुदायिक उपासना उत्सवाचे आयोजन केले होते. त्यामध्ये कोल्हापूरसह राज्यभरातील विविध समाजांतील दोन हजार महिला सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर हे महामातृक क्षेत्र असून या ठिकाणी देवी अंबाबाईचा अखंड निवास आहे. हे शिवपत्नी सती मातेचे आद्य त्रिनेत्र पीठ असून, साडेतीन शक्तिपीठातील प्रथम पीठ म्हणूनही ख्याती आहे. त्यामुळे येथे केलेल्या उपासनेचे फळ अनंत पट आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे देवीच्या भक्तांसाठी भोजन प्रसादाचा आरंभ केला. तसेच दर मंगळवारी वेदशास्त्रसंपन्न सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाबाई देवीस प्रिय असणाऱ्या कुंकुमार्चन सेवेचा प्रारंभ शुक्रवारी केला. दोन हजार महिलांनी या विधीचा लाभ घेतला. उद्घाटन महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते व जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे यांच्या पत्नी अनुराधा देशपांडे, देवस्थान समितीच्या संगीता खाडे, प्रीती देशमुख, ऐश्वर्या नेवाळकर यांच्या उपस्थितीत झाले. या विधीपाठीमागील उद्देश व स्वागत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले, तर सूत्रसंचालन नंदकुमार मराठे यांनी केले. हा विधी पार पाडण्यास संजय जोशी, राजू सुगंधी, गिरीश कुलकर्णी, पिंटू मेवेकरी, सुनील खडके, प्रशांत तहसीलदार, मयूर तांबे, विराज कुलकर्णी यांनी मोलाची कामगिरी केली.
‘अंबाबाई’ची कुंकुमार्चन उपासना
By admin | Published: January 22, 2016 11:18 PM