कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्षांतर्गंत कुरबुरीसंबंधी मला कोणीही सांगितले नाही. तसे काही नाही, असे म्हणत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘कानावर हात’ ठेवल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत उघड झाले. दोन दिवस मी कोल्हापुरात आहे; पण मला पक्षातील कुरघोडीसंबंधी एकानेही तक्रार केलेली नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली. हा मुद्दा राज्य स्तरावर चर्चेला आला. कार्यकर्त्यांमध्येही त्याची सल आहे. खासदार महाडिक सोबत न राहिल्यानेच चांगले वातावरण असताना महापालिका निवडणुकीत ‘एक नंबर’च्या जागा मिळू शकल्या नाही, यासंबंधी कार्यकर्त्यांत सार्वत्रिक चर्चा आहे. यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले, मला काही माहिती नाही. तुमच्याकडून ऐकत आहे. कार्यकर्त्यांच्या काही तक्रारी असल्यास राज्य पातळीवरचे पदाधिकारी लक्ष घालतील. देशात पक्षाची ताकद मर्यादित आहे. या वास्तवाचे भान मला आहे. त्यामुळे मी राष्ट्रपतिपदाची अपेक्षा कशी ठेवू ? देशात भाजप सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे. जनतेने या सरकारला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. एका वर्षात भाजप शासनाच्या कामगिरीवर भाष्य करणे योग्य होणार नाही. अनेक बैठकांत सत्ताधाऱ्यांना जनतेच्या विविध प्रश्नांसंबंधीची जाणीव करून देत असतो. सत्ताधारी आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलत असल्याचे सांगतात. अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी देशहिताला प्राधान्य देत सर्वांनी सहकार्य करणे काळाची गरज आहे. जीएसटी करप्रणालीसाठी मी काही पुढाकार घेणार नाही; पण सर्वपक्षीय बैठकीत जीएसटी येण्यासाठी सहकार्य करावे, असे मत मांडणार आहे.पत्रकार परिषदेस खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, उपमहापपौर शमा मुल्ला, राजू लाटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)राजकारणात असहिष्णुता असणारच...राजकारणात खुर्ची मोकळी होऊन त्या ठिकाणी आपल्याला कसे बसता येईल, असे प्रत्येक जण विचार करत असतात. त्यामुळे राजकारणात असहिष्णुता राहणारच. साहित्यातील असहिष्णुता मात्र दखल घेण्यासारखी आहे. सबनीस यांचे पुणे साहित्य संमेलनातील भाषण ऐकले. त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका मांडली आहे, असे पवार यांनी सांगितले.
कुरबुरीसंबंधी पवारांचे कानावर ‘हात’
By admin | Published: January 19, 2016 12:18 AM