पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे आघाडी अंतर्गत पदांचे वाटप करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, सत्तेच्या चार वर्षांच्या कालावधीत आघाडीची नेहमी बिघाडी होत राहिली. त्यामुळे आघाडीतील अनेक नगरसेवकांना पदापासून वंचित रहावे लागले.
उपनगराध्यक्षा बागवान ठरलेला कालावधी संपला तरी राजीनामा देत नसल्याने आघाडीत धुसफूस सुरू होती. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष पाटील यांच्याकडे दिल्याने इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीने या पदावर दावा केला असून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यबरोबर बैठक होऊन नगरसेवक फारुख जमादार यांना संधी देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. तर काँग्रेसचे पाणीपुरवठा सभापती प्राचार्य सुनील चव्हाण, बांधकाम सभापती दीपक गायकवाड तसेच अद्याप एकही पद न मिळालेल्या नगरसेविका गीता बागलकोटे यांनी आग्रह धरल्याने नगराध्यक्षांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची शहरवासीयांत उत्सुकता लागली आहे.