गणपती कोळी - कुरुंदवाड-- प्रत्येक शहराला कचरा व्यवस्थापनाची समस्या भेडसावत आहे. मात्र, यावर उपाय म्हणून येथील नगरपालिकेने ओला कचरा व सुका कचरा घरातूनच वेगळा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक मिळकतधारकांना दोन बादल्या (डस्टबीन) देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी सर्व नगरसेवकांसह विविध संस्था, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, या योजनेमुळे शहरातील कचरा निर्गतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे, अशी योजना अस्तित्वात आणणारी कुरुंदवाड नगरपालिका ही राज्यातील पहिलीच नगरपालिका ठरणार आहे. सध्या सर्वत्र प्लास्टिकचा वापर होत असल्याने कचऱ्यामध्ये प्लास्टिकचाच भरणा होत आहे. प्लास्टिक कुजत नसल्यामुळे कचऱ्याचा ढीग पडूनच राहत आहे. त्यामुळे प्रत्येक शहराला कचरा व्यवस्थापनाची समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे.कचऱ्यातून प्लास्टिकसारख्या वस्तू बाजूला केल्यास इतर कचरा सहजपणे कुजून त्याचे खतांमध्ये रूपांतर करणे सहजशक्य होते व कचरा निर्गतीची समस्या सुटू शकते. त्यामुळे पालिकेने घराघरांतूनच ओला (कुजणारा) व सुका कचरा (न कुजणारा) वेगळा करण्यासाठी योजना आखली आहे.शहरामध्ये सुमारे सहा ते सात हजार मिळकतधारक आहेत. घरातूनच सुका व ओला कचरा बाजूला करण्यासाठी प्रत्येक मिळकतधारकांना दोन बादल्या (डस्टबीन) देण्यात येणार आहे. या डस्टबीनचा खर्च पालिकेवर न टाकता सर्व नगरसेवक, विविध संघटना व सामाजिक संस्था यांना बादल्या देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला प्रतिसादही मिळत आहे. यासाठी सुमारे बारा ते तेरा हजार डस्टबीन लागणार असून आजच्या पालिका सभेत सर्वच नगरसेवक व नगरसेविकांनी आपापल्या परीने डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला. तसेच शहरातील विविध संस्था, संघटनाकडूनही प्रतिसाद मिळत आहे. पालिकेने घनकचरा व्यवस्थापनावर अभिनव व स्त्युत्य उपक्रम हाती घेतला असून, शहरवासीयांनीही या उपक्रमाबाबत दक्ष राहून घरातूनच कचरा वेगळा करण्यास प्रतिसाद दिल्यास शहरातील कचरा निर्गतीचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. तसेच असा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिलीच नगरपालिका ठरणार आहे.कडाळे यांचा पुढाकारप्रत्येक मिळकतधारकांना डस्टबीन देण्यासाठी पालिका प्रशासनाने सर्व नगरसेवक व संस्थांना आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पालिकेतील बांधकाम सभापती सुरेश कडाळे यांनी चांगल्या प्रतीची सहाशे डस्टबीन खरेदी करून पालिकेला दिली आहेत. त्यामुळे आजच्या पालिका सभेत त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. हे डस्टबीन दलित वस्तीतील प्रत्येक मिळकतधारकांना देण्यात येणार असून, या वस्तीतूनच या योजनेला प्रारंभ होणार आहे.
कुरुंदवाड पालिकेचा कचरा निर्गतीसाठी पुढाकार
By admin | Published: March 22, 2015 10:33 PM