गणपती कोळी
कुरुंदवाड : येथील नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत संदेश देण्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारतीवर जनसंदेश यंत्रणा (पी. ए. सिस्टिम) बसविण्यात आली आहे. या ध्वनिक्षेपकातून सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत संदेश पोहोचू शकतो. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कौतुक केले असून अशी संदेश यंत्रणा बसविणारी जिल्ह्यातील ही पहिलीच नगरपालिका आहे.
पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या नागरी सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. सध्या कोरोना संसर्ग साथ असल्याने शासन, जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार केली जात आहे. पालिका प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, या नियमावलींचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत असल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पालिका इमारतीवर नगरपालिका फंडातून समारे एक लाख रुपये खर्च करून आपत्कालीन जनसंदेश यंत्रणा (पी ए सिस्टीम) बसविली आहे. पालिका इमारतीत बसून ध्वनिक्षेपकावरून शासनाच्या आदेशाची अथवा महत्त्वाची सूचना देता येते. येथून बाहेर पडणारे ध्वनी सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागरिकांपर्यंत सहज पोहोचू शकते.
शहराभोवती कृष्णा आणि पंचगंगा नदी वाहत असल्याने शहर साधारणपणे दोन किलोमीटर परिघातच आहे. त्यामुळे ही जनसंदेश यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
---------------------------
यंत्रणा महत्त्वाची
शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीने वेढा दिला असल्याने शहरवासीयांना प्रत्येक वर्षी महापुराच्या संकटाला तोंड द्यावे लागले. पालिकेच्या संदेश वाहक यंत्रणेमुळे पावसाळ्यात पर्जन्यमान, धरणांतील पाण्याचा विसर्ग, जिल्हा प्रशासनाकडून दक्ष राहण्याबाबत देण्यात येणाऱ्या सूचना देण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय वर्षअखेरीस पालिकेची निवडणूक असून नागरिक, उमेदवार, राजकीय पक्षांना सूचना, माहिती देण्यासाठी निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाला उपयोग ठरणार आहे.
फोटो - ०७०६२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील पालिकेच्या मुख्य इमारतीवर ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहे.