गणपती कोळी -- कुरुंदवाड पालिका निवडणुकीमुळे नगरपालिका कर विभागात कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून, चार दिवसांत दहा लाख पंधरा हजारांवर कर वसुली झाली आहे. निवडणुकीमुळे इच्छुक स्वत:हून सर्व कर भरत असून, पालिका उत्पन्नात भर पडली आहे. शहरात सुमारे साडेपाच हजार मिळकतधारक आहेत. यातील अनेक मिळकतधारकांनी घर बांधकाम, रिकामी जागा, पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने वसुली थकीत पडली आहे. परिणामी पालिका तिजोरी रिकामी झाल्याने शहराचा विकास करताना प्रशासनाला अडचणी येत आहेत. पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच तिरंगी लढत होत असल्याने प्रत्येक प्रभागातून उमेदवार निवडले जात आहेत. निवडणूक लढविणाऱ्यांना प्रथम शासकीय कर भरणे गरजेचे असते, अन्यथा अर्ज छाननीमध्ये अवैध ठरविले जाते. शिवाय यंदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला किमान पाच सूचक अनुमोदक देण्याची अट निवडणूक विभागाने दिली आहे. उमेदवारासह सूचक, अनुमोदकाचे कर भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार स्वत:सह सूचकांचे कर भरत आहेत. अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिल्याने शासकीय कर भरण्यासाठी इच्छुकांनी पालिकेत गर्दी केली आहे. पालिका प्रशासनानेही कर भरून घेण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्याने चारच दिवसांत दहा लाख पंधरा हजारांची वसुली झाली आहे. दोन ते तीन दिवस असल्याने मोठी वसुली होणार असल्याने पालिका प्रशासनातून समाधान व्यक्त होत आहे.
निवडणुकीमुळे कुरुंदवाडला दहा लाखांचा कर भरणा
By admin | Published: October 27, 2016 12:46 AM