कुरुंदवाड : येथे दोन युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोन समाजातील लोक एकमेकांसमोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला. दोन गट पोलीस ठाण्यासमोर आल्याने वादावादीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास चौवडी चौक येथे दोन गटातील युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद शनिवारी सकाळी उफाळून आला. यावेळी दोन गटांत प्रचंड हाणामारी झाली. एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यासाठी दोन्ही गटांचे जमाव पोलीस ठाण्यासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, मोठा पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी आले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीसप्रमुख शर्मा पोलीस ठाण्यात आले. यावेळी दोन्ही बाजंूच्या प्रमुख लोकांची पोलीस ठाण्यात बैठक घेतली. प्रमुख मंडळींनी सामंजस्यपणा दाखवून शांतता राखण्याचे आवाहन करण्याबरोबरच सामंजस्य होत नसेल, तर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पडेल, असा इशारा दिल्याने पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला दोन्ही गटांच्या प्रमुखांनी प्रतिसाद दिल्याने तणाव निवळला. दिवसभरात दोन्ही गटांबाबत तक्रार दाखल केली नसली, तरी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. बैठकीला उपनगराध्यक्ष वैभव उगळे, रामदास मधाळे, राजू आवळे, सिकंदर सारवान, आयुब पट्टेकरी, महावीर आवळे, शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे, दिगंबर सकट, आण्णाप्पा कांबळे सहभागी झाले होते. दरम्यान, पोलीस ठाण्यात शांतता बैठक सुरू असतानाच दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. पोलिसांनी जमावाला पांगविले. येथे राज्य राखीव पोलीस दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (वार्ताहर)
कुरुंदवाडला किरकोळ वादातून तणाव
By admin | Published: October 25, 2015 12:56 AM