प्रकाश पाटील - कोपार्डेविधानसभेच्या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी पी. एन. पाटील यांच्या राजकीय वाटचालीला खिंडार पाडले. याला नरके यांचे काका अरुण नरके यांचा मोठा वाटा आहे. ही सल मनात बोचत असल्याने पी. एन. पाटील गोकुळच्या राजकारणात नेहमीच अरुण नरके यांना बाजूला करत वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला शह देण्यासाठी आता नरकेंच्या हालचालींना वेग आला आहे.गोकुळवर महाडिक, नरके व पी. एन. पाटील यांचे एकतर्फी वर्चस्व आहे. गोकुळ वगळता इतर कोणत्याही राजकीय पटलावर या त्रयींची समान भूमिका दिसत नाही. याचा परिणाम २००९ मध्ये चंद्रदीप नरके यांनी पी. एन. पाटलांच्या विरोधात शड्डू ठोकून आमदारकी खेचून आणली. त्यापासून पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांचे हाडवैर निर्माण झाले, ते गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईपर्यंत सुरू होते.मात्र, गोकुळची निवडणूक सुरू झाल्यानंतर अरुण नरके व पी. एन. पाटील यांनी जुळवून घेत असल्याचा दिखावा सुरू केला आहे. तरी पीएन यांनी संदीप नरकेंच्या नावाला दिलेली पसंती यातून पुन्हा मतभेद चव्हाट्यावर आले. पी. एन. पाटील यांच्या एकछत्री आदेशाला सुरुंग लावण्यासाठीच आमदार नरके यांनी शिवसेनेसाठी एका जागेची मागणी करून ‘कुंभी’चे संचालक अनिल पाटील यांची उमेदवारी दाखलही केली आहे. एवढेच नाही, तर किशोर पाटील यांनी सतेज पाटील यांच्या गटातून उमेदवारी दाखल केली असून, सोशल मीडियावरून त्यांचा प्रचारही सुरू आहे. किशोर पाटीलसुद्धा आमदार नरके यांचे समर्थक असून, त्यांची उमेदवारी विरोधी गटाकडून दाखल झाल्याने आमदार नरके काका अरुण नरके यांच्या विरोधात जाणार का? याबाबत चर्चा रंगली आहे.
‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील
By admin | Published: March 25, 2015 11:52 PM