लांजा : तालुक्यातील कुवे येथे चोरट्यांची दहशत अद्याप कायम असताना असे प्रकार धुंदरे गावातही वाढीला लागले आहेत. त्यामुळे या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी लांजा पोलिसात निवेदन सादर करुन पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.कुवेपाठोपाठ धुंदरे ग्रामस्थांनाही चोरट्यांची भीती जाणवू लागली आहे. दरवाजावर थापा मारणे, घरावर दगड मारणे अशा प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या प्रकाराने महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या भात कापणीचा हंगाम असल्याने महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत. येथील ग्रामस्थ जागता पहारा देत आहेत. गेल्या चार दिवसात चोरी झाली नसली तरी घराच्या दारांवर थापा मारणे, घरांवर दगड पडणे, असे प्रकार वाढले आहेत. या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी व ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे. या निवेदनावर १२० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)कुवे येथेही घबराटअज्ञाताने बुधवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास कुवे येथे ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे कर्णफूल खेचण्याचा प्रयत्न केला. गिरिजा विचारे असे या महिलेचे नाव आहे. त्या भांडी घासण्यासाठी गेल्या असताना अज्ञाताने बल्बला काळ्या रंंगाचा कपडा लावला व कर्णफूल ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटा सापडू शकला नाही.
कुवेत चोरट्यांची दहशत कायम; पोलीस संरक्षणाची मागणी
By admin | Published: October 09, 2015 1:06 AM