लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : येथील महात्मा गांधी रुग्णालयात लस घेण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून बसलेल्या नागरिकांना लस न मिळाल्याने व त्या नागरिकांना प्रशासनाने कोणतीही सूचना न दिल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक विलास गाडीवडर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ४५ वयोगटातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी अशी जाहिरात प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. स्थानिक आमदार, खासदार व प्रशासन ही लस घेण्यासंदर्भात जागृती करीत आहे. पण असे असताना नागरिक लस घेण्यासाठी रुग्णालयात गेले असता लस मिळत नसल्याचा प्रकार गुरुवारी घडला.
सकाळी सहा वाजल्यापासून गांधी हॉस्पिटलच्या आवारात थांबलेल्या नागरिकांना अकरा वाजले तरी लसीबद्दल कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी याची तक्रार नगरसेवक विलास गाडीवडर यांच्याकडे केली. गाडीवडर, नगरसेवक रवींद्र शिंदे, डॉ. जसराज गिरे यांनी महात्मा गांधी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दररोज महात्मा गांधी रुग्णालयास किती लसी प्राप्त होतात, व त्या कशा दिल्या जातात यासंदर्भात नागरिकांना माहिती देणे गरजेचे असून तसा फलक रुग्णालयाबाहेर लावा. कारण नागरिक सकाळी सहा वाजल्यापासूनच गर्दी करीत असल्याने आवश्यक सूचना देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिक उन्हातच थांबत असून त्यांना सावलीसाठी मंडपाची सोय करावी व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली.
महात्मा गांधी रुग्णालयात दररोज ३०० लसी येत असून त्यातील १५० लसी खासगी रुग्णालयांना देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर उरलेल्या लसी नागरिकांना दिल्या जातात. दरम्यान, नागरिकांना वारंवार लस न घेता परत यावे लागले आहे. यामुळे या ठिकाणी लसीची मुबलक प्रमाणात उपलब्धता करावी अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे.
फोटो
निपाणी : नागरिकांना लस मिळत नसल्याने नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.