कोल्हापूर : सुवर्णमहोत्सवी वर्षातील शिष्यवृत्ती व योजना, संगणकीकरणाला चालना, अशा जुन्या योजनांना बळ देणारे चार कोटी ३८ लाखांच्या तुटीचे एकूण ३१९ कोटी ११ लाखांचे सन २०१५-१६ चे अंदाजपत्रक शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर झाले. यातील तुटीत वाढ झाली आहे. विधायक, नावीन्यपूर्ण उपक्रमांचा अभाव आणि विकासाच्यादृष्टीने शून्य, असे हे अंदाजपत्रक असल्याची प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) व्यक्त केली. विद्यार्थी केंद्रित, संगणकीकरणास चालना आणि संशोधनास प्रोत्साहन देणारे हे अंदाजपत्रक असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. टी. शिर्के यांनी अधिसभेत अंदाजपत्रक सादर केले. अधिसभेसमोर २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी मांडलेले हे अंदाजपत्रक चार कोटी ३८ लाख तुटीचे आहे. या वर्षात ३१४ कोटी ७३ लाख रुपये अपेक्षित जमा असून, अपेक्षित खर्च ३१९ कोटी ११ लाख आहे. यात विद्यापीठाच्या मुद्रणालयातील मशिनरी बदलण्यासाठी ७५ लाखांची तरतूद असून, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीची वाढलेली व्याप्ती वगळता नवीन काहीच नाही. गतवर्षीच्या अंदाजपत्रकातीलच योजनांना बळ देण्याची तरतूद केली आहे. सभेत, सुधारित अंदाजपत्रक आधी का मांडले नाही? अंदाजपत्रक बनविणारी समितीच सुधारणा कशी सुचविते? महिला कर्मचारी, विद्यार्थिनींसाठी नवीन योजना का समाविष्ट केल्या नाहीत? व्हॅट, एलबीटी, ध्वजनिधी त्या-त्या विभागांना वर्ग का केला नाही, अशा मुद्द्यांवर ‘सुटा’चे प्रा. डॉ. एस. ए. बोजगर, अशोक कोरडे, सविता धोंगडे, आर. एच. पाटील यांनी आक्षेप घेतला. विद्यापीठ विकास आघाडीच्या भैया माने, अमित कुलकर्णी, अनिल घाटगे यांनी विद्यार्थी हिताचे, विद्यापीठाच्या विकासाला गती देणारे अंदाजपत्रक असल्याचे सांगत काही सूचना केल्या. त्यावर डॉ. शिर्के यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर हे अंदाजपत्रक अधिसभेने एकमताने मंजूर केले. (प्रतिनिधी) अपेक्षित खर्च...प्रशासकीय विभाग : ४७ कोटी ५ लाखशास्त्र अधिविभाग : २ कोटी ४८ लाखइतर अधिविभाग : २ कोटी ७५ लाखविविध सेवा व इतर विभाग : २९ कोटी ९९ लाखघसारा निधी : ८ कोटी १२ लाखसंशोधन व विकास निधी : १४ कोटी २५ लाखशासकीय वेतन अनुदान : ५५ कोटी २२ लाखवित्तीय संस्था निधी खर्च : ४९ कोटी ९८ लाखनिलंबन लेखे : १०९ कोटी २७ लाखअपेक्षित जमा... प्रशासकीय विभाग : ३९ कोटी ८२ लाखशास्त्र अधिविभाग : २ कोटी ४५ लाखइतर अधिविभाग : २ कोटी ५४ लाखइतर उपक्रम : २५ कोटी ३८ लाखशासनाकडून वेतन अनुदानापोटी : ५५ कोटी २२ लाखविविध संस्थांकडून प्रकल्पांसाठी : ४९ कोटी ९८ लाखसंशोधन व विकास निधी : १४ कोटी २५ लाखघसारा निधी शिल्लक रक्कम : ८ कोटी १२ लाखनिलंबन लेखे : ११६ कोटी ९७ लाख
विद्यापीठाच्या बजेटमध्ये नावीन्याचा अभाव
By admin | Published: March 27, 2015 10:40 PM