कोल्हापूर : जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तसेच पशुधनाचेही नुकसान झाले आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यड्राव परिसरातील १५ घरांची पडझड यड्राव : अतिवृष्टीने यड्राव, जांभळी, हरोली, खोतवाडी, तारदाळ परिसरातील १५ घरांची पडझड झाली. तसेच शेळी व कोकरू ठार झाले असून, सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यड्राव बेघर वसाहत येथील शकुंतला बापू कोतमिरे यांच्या घराच्या दोन भिंती पडल्याने सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच राजस सुदाम पोवार यांच्या वीट-मातीच्या राहत्या घरातील भिंत कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले, तर बेघर वसाहतमधील सुनीता आदम भोरे यांचे छप्पर कोसळून शेळी व कोकरू ठार झाले. त्यामुळे त्यांचे २0 हजारांचे नुकसान झाले. वसंत बाळू दावाडे यांच्या घराची पडझड होऊन दहा हजारांचे नुकसान झाले. घटनास्थळी जाऊन तलाठी अविनाश कुंभार यांनी पंचनामा केला. जांभळी येथील बाबू ज्ञानू पोवार, शशिकांत इराप्पा कांबळे, महादेव सूर्यवंशी, शंकर आप्पासाहेब शेवाळे, सर्जेराव रामा कोळी व कलावती यशवंत कोळी यांच्या घरांची पडझड होऊन प्रत्येकी १५ हजारांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठी सत्तार गवंडी यांनी केला. तारदाळमध्ये बाळू सखाराम शिंदे, कृष्णा ज्योती बेनगे व विजया शंकर शिंदे यांच्याही घरांची पडझड होऊन प्रत्येकी २0 हजारांचे नुकसान झाले. तसेच खोतवाडीमधील श्रीकांत शंकर चोपडे यांच्या घराची भिंत पडल्याने २0 हजारांचे, तर बाळू रामचंद्र भोसले यांच्या घराचे २५ हजारांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठी ई. टी. धोंड यांनी केला. कसबा तारळेत घराची भिंत कोसळली कसबा तारळे : गेल्या चार दिवसांच्या संततधार पावसाने येथील युवराज भाऊ कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत मंगळवारी मध्यरात्री कोसळली. घरातील सर्वजण बाहेरच्या सोप्यात झोपल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. युवराज कांबळे यांचे येथील हरिजन वसाहतीमध्ये घर आहे. या घराशेजारीच दत्तात्रय हरी कांबळे यांचे घर आहे; परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून या घरात कोणीही राहत नसल्याने ते पूर्णत: जीर्ण झाले आहे. पावसाने मध्यरात्री ही भिंत कोसळली. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले; परंतु जोरदार पाऊस असल्याने पहाटेपर्यंत पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागली. बाजूच्या पडक्या घरामुळेच आपल्या घराची गेल्या चार वर्षांत दोनदा भिंत कोसळल्याचे युवराज कांबळे यांनी सांगितले. म्हाकवेत भिंत पडून नुकसान म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील बाजीराव धोंडिबा पाटील यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. या घराच्या पश्चिमेकडील बाजूला असणाऱ्या शिवाजी दत्तात्रय पाटील यांच्या घरावर ती पडली. सध्या शिवाजी पाटील यांचे घर शाहू कृषी खत विक्री संघाच्या शाखेसाठी भाडोत्री दिले आहे. संततधार पावसामुळे ही पडझड झाली असून, यामध्ये सुमारे ५0 हजारांहून अधिक नुकसान झाले आहे. आलासमध्ये दोन घरे जमीनदोस्त बुबनाळ : सलग तीन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे आलास (ता. शिरोळ) येथील दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत, तर चार घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मंगळवारी सायंकाळी मौला विजापुरे यांचे घर कोसळले. यावेळी घरातील सर्व मंडळी बाहेर असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. त्याचबरोबर मुरलीधर कांबळे यांचेही घर पावसाने उद्ध्वस्त झाले आहे, तर रामचंद्र जाधव, सिद्राम गावडे, इराप्पा गावडे, मधुकर कोई या चारजणांच्या घरांची पडझड झाली आहे. तलाठी तायवाडे यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. बोरवडे परिसरात वीजपुरवठा खंडित बोरवडे : गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी राहिल्यामुळे ऊस पिकांना धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे बिद्री येथे विद्युत पोल पडून गेले चार दिवस वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच वाळवे खुर्द येथील दत्तात्रय जाधव यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. बिद्री (ता. कागल) येथील पुलाजवळील वसाहतीमध्ये पोल पडल्याने या परिसरात अंधार आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना माहिती देऊनही कोणीही तिकडे फिरकले नसल्याने नागरिक व व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात शाखा अभियंता प्रशांत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता पडलेल्या पोलच्या ठिकाणी काम करण्यास अडचण असून, लवकरच नवीन पोल उभा करून वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे त्यांनी सांगितले. कुशिरे, पोहाळे येथील घरांची पडझड पोहाळे तर्फ आळते : अतिवृष्टीमुळे कुशिरे, पोहाळे येथील घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कुशिरे येथील बाबासो कळके, बाळू कांबळे, संजय कांबळे, किशोर खाटकी, तर पोहाळे येथील हिंदुराव कांबळे, जोतिराम बोरचाटे, बाजीराव बोरचाटे, अशोक मोरे, भिकाजी पोवार, शिवाजी थोरवत यांच्या घरांची पडझड झाली. बुधवारी दिवसभर तलाठी कार्यालयाच्यावतीने पंचनामा सुरूहोता. केनवडे तलाव भरला म्हाकवे : केनवडे (ता. कागल) येथील पाझर तलाव तुडुंब भरला असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. सध्या या तलावात १0 एफ.सी.एफ.टी. इतके पाणी साठले आहे. त्यामुळे तलावानजीकच्या विहिरींसह ५0 हेक्टर जमिनीचा, तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पट्टणकोडोलीत घरांत पाणी पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील माळ भागातील तलावातून गावखणीला जोडणारा पाण्याचा भूमिगत पाट तुंबल्याने तलावातून येणारे पाणी येथील लोहार गल्लीतील काही घरांत घुसले. ग्रामपंचायतीने दोन दिवस अथक प्रयत्न करून हा पाट दुरुस्त केला. त्यामुळे तळ्याचे पाणी थेट खणीत मिसळले. अनेक वर्षांपासून गावखणीतील प्रदूषित झालेले पाणी प्रवाहित होऊन खण स्वच्छ होण्यास यामुळे मदत होणार आहे. पट्टणकोडोलीमध्ये माळ भागात तांबडा तलाव आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला की याचे पाणी भूमिगत पाटामधून गावखणीमध्ये सोडण्याची व्यवस्था अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. गेल्या काही वर्षांपासून माळावरील तलाव पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. त्यामुळे हा भूमिगत पाट नादुरुस्त झाला आहे. तलावातील पाणी गावखणीत न आल्याने खणीचेही पाणी प्रदूषित बनले आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळावरील तलाव तुडुंब भरला आहे. बर्की, पाल बंधारे पाण्यात कोतोली : शाहूवाडी दक्षिण परिसरात बर्की, पाल येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पाल, इंजोली, सावर्डी, मरळे, बर्की या गावांचा संपर्क तुटला आहे. बर्कीच्या बंधाऱ्यावर पाणी आल्याने धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना येथे जाता येत नाही. त्यामुळे पर्यटकांत नाराजी असून, स्थानिक व्यावसाईक ग्राहकांच्या प्रतीक्षेत राहिले आहेत. कोल्हापूर-अणुस्कुरा-राजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारभोगावला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पन्हाळ्यात पूरस्थिती कायम पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात बुधवारी दिवसभर पावसाने उसंत दिली असली तरी पुराची स्थिती कायम असल्याने बुडालेल्या मार्गांवरून पाणी कायम असून, वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, पावसामुळे घरांच्या पडझडीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ९५ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे प्रशासनाने सांगितले. कासारी, कुंभी, धामणी, जांभळी, वारणा या नद्यांना महापूर आला आहे. कळे-काटेभोगाव व कोल्हापूर-पन्हाळा हे महामार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने पूर्णपणे बंद आहेत. आसुर्ले, म्हाळुंगे, सातवे, आदी गावांत घरांची पडझड झाली असून, पुन्हा १२ घरांची पडझड झाल्याचे तहसीलदार राम चौबे यांनी सांगितले. भादोले परिसरात पाणी साचल्याने पिके धोक्यात भादोले : भादोले परिसरात गेले पाच दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके धोक्यात आली आहेत. शासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. वारणा नदीकाठचे पात्र पाण्याने भरून नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने नदीकाठावरील पिके बुडाली आहेत. अनेक पिके पाण्याच्या निचऱ्याअभावी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मिरची, पालेभाज्या, भात, ऊस, आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पडझडीने लाखोंचे नुकसान
By admin | Published: July 14, 2016 12:40 AM