कोल्हापूर : जगभरातील देश भारताचा उल्लेख ‘उगवती सत्ता’ असा करतात; पण भारतानेच अजून याचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे देशाच्या परराष्ट्र धोरणात ठोस उद्दिष्टांचा अभाव जाणवतो. सध्या अन्य राष्ट्रांशी भारताचे खूप चांगले संबंध असून, या सकारात्मक वातावरणात या देशाने लष्करी नव्हे तर नैतिकदृष्ट्या जगाचे नेतृत्व केले पाहिजे. त्यासाठी राजकीय नेतृत्वाने सक्रिय असले पाहिजे; नाही तर आपण नवी महासत्ता म्हणून पुढे न येता कायम ‘उगवती सत्ता’च राहू, अशी भीती डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्यांनी ‘बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी दै. ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार होते. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.
सहस्रबुद्धे म्हणाल्या, गेल्या २५ वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणात झालेल्या बदलांचे प्रतिबिंब भारताच्या धोरणात आढळते. भारताकडे संस्कृती आणि इतिहासाची सौम्य सत्ता आहे. मोदींच्या सरकारने गेल्या चार वर्षांत शेजारी देशांना प्राधान्य दिले आहे. पाकिस्तान वगळता अन्य शेजारी देश तसेच म्यानमार, व्हिएतनामसारख्या दूरच्या शेजारी देशांशीही आपले चांगले संबंध आहेत. व्यापारवृद्धीसाठी सागरी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. या सगळ्यांत भारताचे अन्य देशांशी संंबंध प्रस्थापित करणे आणि आर्थिक वाढीचे फायदे वाटून घेणे हे सूत्र समान आहे. धोरणात्मक भागीदारी हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सूत्र असून भारताच्या धोरणात त्याचे प्रतिबिंब उमटते. आता भारताने जगाचे लष्करी नव्हे तर नैतिक नेतृत्व केले पाहिजे. त्यासाठी उद्दिष्टांमध्ये धोरणांमध्ये स्पष्टता हवी, जे गेल्या ७० वर्षांत झालेले नाही.त्या म्हणाल्या, १९ व्या आणि २० व्या शतकात झालेल्या दोन महायुद्धांनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक बदल झाले. अमेरिका व सोव्हिएट युनियन या दोन महासत्ता निर्माण होऊन द्विधृवीय राजकारण सुरू झाले. मात्र २० व्या शतकात सोव्हिएट महासत्ता संपली आणि अमेरिका एकमेव महासत्ता राहिली. अमेरिकेतील २००१ सालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत, चीन, रशिया यांसारख्या अनेक सत्तांचा उदय झाला, ज्यांनी अमेरिकेच्या प्रभुत्वाला आव्हान दिले. आज युद्धे होत नाहीत, मात्र हिंसा सुरूच आहे. जगभरातील देश अन्य देशांशी संबंध प्रस्थापित करणे आणि संतुलन सांभाळण्याचे राजकारण करीत आहे; तर दुसरीकडे ध्येयधोरणांना विरोधही करीत आहेत. या सगळ्या परिस्थितीत भारताने ठामपणे आपले नेतृत्व सिद्ध केले पाहीजे.श्रीराम पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. अशोक चौसाळकर यांनी प्रास्ताविक केले.राजर्षी शाहू व्याख्यानमालेत शुक्रवारी उत्तरा सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले.